मुंबई पोलिसांवर खड्डे बुजवण्याची वेळ; कुठे गेले मिंध्यांचे कंत्राटदार मित्र? आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

राज्यात तीन दिवसापासून पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा कोकण आणि मुंबईला सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच अनेक महामार्गांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मिंधे सरकारने त्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी रस्त्याच्या कामाच्या निविदा वाटल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील सर्वच रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. शहरातील या रस्ते घोटाळ्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला होता. आता आदित्य ठाकरे यांनी रस्त्याची दुरवस्था उघड करत मिंध्यांचे कंत्राटदार मित्र कुठे गेले असा संतप्त सवाल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात त्यांनी मुंबई पोलीस शहरातील खड्डे बुजवण्याचे काम करत असल्याचे दिसते. शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशावेळी रस्त्यांच्या कामाची आणि दुरुस्तीचे कंत्राटे घेणारे मिंध्यांचे कंत्राटदार मित्र कुठे गेले, शहरातील खड्डे बुजवण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच रस्त्यातील खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. हे गंभीर आहे. याआधी राज्यात किंवा शहरात असे घडले नव्हते. कोणत्याही सरकारने पोलिसांना अशा कामाला जुंपले नव्हते. त्यामुळे मिंध्यांचे कंत्राटदार मित्र कुठे गेले असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.