Rantagiri News : रत्नागिरीत पावसाचा कहर; खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले

रत्नागिरीमध्ये जोरदार सरी बरसत असून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी शिरले आहे. तसेच जिल्ह्यातील अर्जुना, कोदावली आणि काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीची पाणी पातळी वाढल्याने चांदरेाई पुलावर पाणी आले आहे. तसेच राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. जिल्ह्यातील कोदवली आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. तसेच तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे आजुबाजुच्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढून राजापूर शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे.