दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असताना शुक्रवारी दुपारनंतर तिलारी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. यामुळे तिलारी नदीवर बांधण्यात आलेला घोटगे, परमे, साटेली, भेडशी गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. यामुळे साटेली, भेडशी, परमे, घोटगे गावांचा संपर्क तुटला. यामुळे काही ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी अडकून पडले. काही जणांनी तिलारी कालव्याच्या रस्ताचा आधार घेत चार ते पाच किलोमीटर फेरा मारून घर गाठले.
गरज असेल तरच घराबाहेर पडा
उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढच्या काही तासांत मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 21 जुलैदरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय घाट क्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिवाय घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.