कोरोनामुळे हिंदुस्थानात 12 लाख मृत्यू! सायन्स अ‍ॅडव्हान्स पब्लिकेशनचा अहवाल, मोदी सरकारने दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह

कोरोना काळात हिंदुस्थानात किती मृत्यू झाले याबाबत मोदी सरकारने कायम मौन बाळगले आहे. बरीच आरडाओरड झाल्यानंतर कोरोनामुळे देशात 4.81 लाख मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले. जगभरातील नामवंत लोकसंख्यातज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांनी मोदी सरकारच्या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून कोरोनामुळे हिंदुस्थानात 12 लाख मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल सायन्स अ‍ॅडव्हान्स पब्लिकेशनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

2019 ते 2021 या काळात कोरोनाने हिंदुस्थानात थैमान घातले होते. कोरोनामुळे देशात अगणित मृत्यू झाले. परंतु मोदी सरकारने याबाबतची आकडेवारी कधीही समोर येऊ दिली नाही. बरीच ओरड झाल्यानंतर सरकारने पहिल्या लाटेत दीड लाख आणि दुसर्‍या लाटेत अडीच लाखांवर असे एकूण 4.81 लाख मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. या आकडेवारीवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला गेला.

आता सायन्स अ‍ॅडव्हान्स पब्लिकेशनमध्ये जगभरातील नामवंत लोकसंख्यातज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांनी हिंदुस्थानातील कोरोनाकाळाबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोनामुळे हिंदुस्थानात सरकारी आकडेवारीपेक्षा आठपट अधिक बळी गेल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंदुस्थानात 12 लाख लोकांनी जीव गमावल्याचा या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या मदतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महिलांवर जाणवला. कोरोनामुळे पुरुषांचे आयुर्मान 2.1 वर्षांनी तर महिलांचे तीन वर्षांनी घटल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हिंदुस्थानात पावणेपाच लाख मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा जागतिक आरोग्य संघटनेनेही फेटाळला होता. या काळात हिंदुस्थानात 20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आणि हा जगातील सर्वाधिक आकडा होता, असा दावाही जागतिक आरोग्य संघटनेने केला होता. या नव्या अहवालावर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.