स्मृतिगंध – अभिनयाचा अस्सल रियाझ जयंत सावरकर

>>मेघना साने

बॅकस्टेज आर्टिस्ट ते अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय जयंत सावरकर ऊर्फ अण्णा यांनी आपल्या अभिनयाने तीन पिढय़ांच्या रसिकांना रिझवले. 24 जुलै हा त्यांचा प्रथम स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत कलाकार म्हणून आपल्या भूमिका गाजवणार्या अण्णांच्या स्मृतीस उजाळा देण्याचा प्रयत्न.

बॅकस्टेज आर्टिस्ट ते अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय जयंत सावरकर ऊर्फ अण्णा यांनी आपल्या अभिनयाने तीन पिढय़ांच्या रसिकांना रिझवले. त्यांच्या निधनाची बातमी 24 जुलै 2023 रोजी मिळाली तेव्हा कुणाचाच विश्वास बसेना. ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका सोनी चॅनेलवर लोकप्रिय होती आणि त्यात प्रेक्षक अण्णांचा अभिनय पाहत होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत अण्णा कलाकार म्हणून आपल्या भूमिका गाजवत राहिले.

स्वतची उंची कमी आहे याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्या क्षमतांवर अण्णांनी विश्वास ठेवला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोगळेकर आणि दामू केंकरे यांच्याकडे अण्णांचे अभिनयाचे एक प्रकारे प्रशिक्षणच झाले होते. दामू केंकरे यांच्या नाटकात अण्णांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. तरी त्यांचे कान मात्र नटांच्या डायलॉगकडे असायचे. मोठमोठय़ा कलाकारांचा अभिनय समजून घेऊन त्यांनी स्वतची अशी एक स्टाईल घडवली. ती म्हणजे रंगभूमीवर अतिशय साधेपणाने वावरणे. सर्वांनाच हे रंगभूमीवरील वा चित्रपटातील भूमिका करणारे अण्णा नेहमी आपला माणूस वाटत आले. ‘सूर्यास्त’मधील गायकवाड, ‘एकच प्याला’मधील तळीराम, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिकांमुळे अण्णांना लोकप्रियता मिळाली. कामे सतत मिळत गेली. 150 हून अधिक नाटकांत आणि 100 हून अधिक चित्रपटांत अभिनेता म्हणून काम केलेले अण्णा स्वतला ‘एक छोटा माणूस’ म्हणवत. आपले आत्मचरित्र त्यांनी ‘एक छोटा माणूस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केले.

साधारणपणे रंगभूमीवर काम करताना अभिनेते इतर नटांच्या भूमिकेत फार रस घेत नाहीत. प्रतिक्रियेपुरताच त्यांचा दुसऱया भूमिकेशी संबंध असतो, पण जयंत सावरकरांना अनेक नाटकांतील नटांच्या संहिता आणि हालचालीही तंतोतंत पाठ असायच्या. ते कधी मोकळे असत तेव्हा गिरगावातील साहित्य संघात नाटकाला जाऊन बसणे हा त्यांचा अभिनयाचा रियाझ होता. एकच नाटक अनेकदा बघितल्यामुळे त्यांना अनेक नाटकांच्या संहिता पाठ होत गेल्या.

निर्माता सुधीर भट यांनी आपल्या ‘सुयोग्य’ नाटय़ संस्थेतर्फे 1998 साली काही नाटकांचा दौरा अमेरिकेला नेला. या वेळी ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकासाठी जयंत सावरकर यांच्याऐवजी दुसरा कलाकार नेण्याचे ठरले, पण अमेरिकेतील मराठी आयोजकांच्या खास आग्रहास्तव अखेर अण्णांचीच वर्णी लागली. निर्माता सुधीर भट यांनी सन्मानाने अण्णांना अमेरिकेला नेले. तिथे दौऱयादरम्यान एक नवीनच अडचण आली. ‘सुंदर मी होणार’ या नाटकात डॉ. लागू प्रमुख भूमिका करत होते. परंतु दौऱयावर निघण्यापूर्वी ऐनवेळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवासाची परवानगी दिली नाही. डॉ. लागू यांची ही महत्त्वाची भूमिका कोण करेल असा प्रश्न उभा राहिला. जयंत सावरकर एकपाठी असल्याने त्यांनाच ही भूमिका करण्याची विनंती करण्यात आली. आपली उंची कमी आहे याची पर्वा न करता आपल्या अभिनयाचा कस लावून सावरकरांनी डॉ. लागू करणार असलेली ‘डॉ. पटवर्धन’ ही भूमिका उत्तम उभी केली आणि प्रेक्षकांना ती भावलीदेखील.

1991 सालची गोष्ट. दूरदर्शनवर तेव्हा मराठी मालिका नुकत्याच सुरू झाल्या होत्या. गोवा मुक्ती संग्रामावर आधारित ‘शेजार’ नावाच्या मालिकेचे शूटिंग करायला आम्ही 20-25 कलाकार गोव्याला दोन आठवडे मुक्काम ठोकून होतो. आमच्यासोबत जयंत सावरकरही होते. शूटिंग दोना पावला बीच किंवा एखाद्या चर्चजवळ असताना आम्ही सर्वच कलाकार त्या सेटवर उपस्थित असायचो. दूर कुठेतरी सीन सुरू असायचा. अण्णांनी आपल्या विनोदी स्वभावाने आम्हाला खूप हसवले होते. काही ना काही संवाद कलाकारांमध्ये होत राहिला. अण्णा बरोबर असल्याने आम्हाला घराची आठवण फारशी येत नव्हती. पुढे तीस वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये मी जयंत सावरकर आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांच्यावर ई-प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजनसाठी एक एपिसोड बनवला. त्यानिमित्ताने त्यांच्या समवेत अर्धा दिवस राहण्याची संधी मिळाली. आपले मालिकांचे शूटिंग सांभाळून अण्णा ठाण्यातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहायचे आणि व्यासपीठावरून नाटक या विषयावर बोलायचे. त्यांचे गमतीजमतींनी भरलेले भाषण बोधप्रदही असायचे.

जयंत सावरकर यांनी नव्या कलाकार पिढीशीदेखील छान जुळवून घेतले होते. जुन्या पिढीतील दिग्दर्शकांच्या मुशीतून जरी ते घडले होते तरी आजूबाजूच्या वातावरणात त्यांनी नेहमीच स्वतला मिसळून ठेवले होते. ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेने त्यांना हिंदुस्थानभर पोहोचवले. वेब सीरिज ‘समांतर’मधील त्यांची भूमिकाही लोकांच्या लक्षात राहिली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला होता. ‘97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

अण्णांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आम्हा सर्व कलाकारांतर्फे त्यांना आदरांजली!

[email protected]