लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा पराभव झाला. उत्तर प्रदेशात प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत तर भाजपची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. निवडणुकीत अयोध्येत भाजपला धुळ चारणारे आणि आता जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद, समाजवादी पक्षाचे आझमगडचे खासदार धर्मेंद यादव, आमदार नफिस अहमद ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख… pic.twitter.com/fFjN8GN9zh
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 20, 2024
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासह काही नेते हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर चौत्यभूमीवर अभिवादन केले आणि त्यानंतर मणी भवन येथे भेट दिली. आज समाजवादी पक्षाचे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद, समाजवादी पक्षाचे आझमगडचे खासदार धर्मेंद्र यादव, आमदार नफिस अहमद यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेखही उपस्थित होते.
अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काही वेळ औपचारीक संवाद ही साधला. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
‘धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही’
अयोध्येतून विजयी झालेल्यांना भेटण्याची इच्छा उद्धव ठाकरेसाहेबांनी व्यक्त केली होती. आज मी, धर्मेंद्र यादव आणि अबू आझमी या सर्वांनी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमची ही औपचारीक भेट होती, असे अवधेश प्रसाद यांनी सांगितले. तसेच, अयोध्येतील जनतेने मला निवडून दिले. या देशात धर्माच्या आधारावर राजकारण चालणार नाही तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधारे हे राजकारण चालेल. इथे आरक्षणाचे राजकारण चालेल आणि जो भारताला मजबूत करण्यासाठी काम करेल, तोच चालेल, असे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अवधेश प्रसाद म्हणाले.