>>तुषार प्रीती देशमुख
पंचामृतामुळे नैवेद्याच्या ताटाची जशी शोभा वाढते तशीच आई व मुलाच्या मेहनतीचे फळ म्हणजे ‘जोशी आईंचे – पंचामृत.’ इथे मिळते आईच्या हातच्या चवीचे जेवण. आयुष्यात आलेल्या प्रत्येक टप्प्यातील अडचणींना हसतमुखपणे मेहनतीच्या जोरावर सामोरे जात आई-मुलाची ही जोडी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
आईच्या हातच्या घरगुती पदार्थांची मेजवानी कोणाला बरं आवडत नाही? पण अनेकांना अनेक कारणांमुळे ती मिळणं शक्य होत नसतं. आईने प्रेमाने बनवलेला पदार्थ किंवा तिच्या देखभालीमध्ये तयार झालेल्या पदार्थाची चव पहिल्या घासात जाणवते. हीच आईच्या हातची जेवणाची चव अनेकांना अनुभवायला मिळते ती शोभा काकूंनी प्रेमाने बनवून खाऊ घालत असलेल्या व त्यांच्या मुलाने आशीष जोशी याने चालू केलेल्या ‘जोशी आईंचे पंचामृत’ या दादरमधील त्यांच्या दुकानात.
आशीष जोशी यांचे आजोबा गोविंद भार्गव जोशी यांनी 1955 साली गोखले रोड, नॉर्थ येथील सर्वोदय भुवन येथे दुकान विकत घेऊन ‘रमेश प्रोव्हिजन स्टोअर्स’ची जोमाने सुरुवात केली. कालांतराने त्यांचा मुलगा रमेश जोशी यांनी 1981 साली ‘शीतल स्नॅक्स’ या नावाने एक छोटंसं उपहारगृह त्याच जागेत चालू केलं. या उपहारगृहात रमेश काका स्वत काही पदार्थ बनवून ग्राहकांना खाऊ घालत असे. त्यांना या व्यवसायात मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची. त्या अनेक घरगुती पदार्थ बनवून उपाहारगृहात पाठवत असत.
शोभाकाकूंना लहानपणापासूनच जेवणाची खूप आवड होती. त्यांनी त्यांच्या आईकडून स्वयंपाकाचे धडेही गिरवले होते. सासरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या सासूबाई रमाबाई जोशी यांनी मोकळीक दिली होती. व्यवसायासाठी जेव्हा त्या पदार्थ बनवायच्या तेव्हा त्यात सासूबाई त्यांना मार्गदर्शन करायच्या आणि बनवायलादेखील मदत करायच्या.
व्यवसाय म्हटला की, त्यात चढ-उतार आलेच. त्यांनाही व्यवसायात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. अशा वेळी शोभाकाकूंनी पदार्थ विकून अर्थार्जन केलं. 1993 ‘शीतल स्नॅक्स’ची रमेश जोशी आणि दोन्ही मुले आशीष व मनीष या तिघांनी मिळून ‘शीतल व्हिडीओ लायब्ररी’ स्थापन केली. त्या काळात व्हिडीओ लायब्ररीला खूप मागणी होती. पण शोभाकाकूंनी मात्र त्यांचा घरगुती व्यवसाय चालूच ठेवला.
घरातली परिस्थिती जेव्हा संपूर्णपणे डगमगते तेव्हा खंबीरपणे उभी राहते ती घरची गृहिणी! पहाटे लवकर उठून दुधाचे केंद्र चालवणं, शुश्रृषा हॉस्पिटलला भाजी विकणं व त्यानंतर स्वयंपाक करून डबे पुरवणं, त्यानंतर लाडू, पुरणपोळी, मोदक, चिवडा व असे अनेक पदार्थ बनवणं असा शोभाकाकूंचा दिनक्रम होता. 1998 साली आशीषने पुन्हा बदलत्या व्यवसायाला आधार देण्यासाठी ‘सेन्सेशन गिफ्ट शॉप’ची स्थापना केली. हा व्यवसाय त्याचा चांगला चालला. 2001 साली मोबाईलच्या व्यवसायात पदार्पण केलं आणि उंच भरारी घेतली. हे सगळं होत असताना शोभाकाकूंनी घरगुती जेवण पुरवण्याचा व्यवसाय काही बंद केला नाही. त्यातच पुन्हा त्यांच्या कुटुंबावर संकटाची सावली पडली आणि त्यात आशीषचे प्रचंड नुकसानदेखील झाले.
त्यांच्या आयुष्यात एक दिवस असाही आला की, हे दुकान आपल्याला विकावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण शोभाकाकू खंबीरपणे उभ्या राहिल्या. आईची साथ लाभते तेव्हा मुलगा विश्व जिंकतो. त्याप्रमाणे कोरोनाच्या काळात आईने घरी बनवलेले पदार्थ तो दुकानात विकू लागला आणि पदार्थांच्या चवीमुळे मागणी वाढत गेली. आशीषने मग व्हाट्सआप ग्रुप तयार करून त्यात आजचा मेन्यू टाकायला सुरूवात केली. त्याप्रमाणे ग्राहक ऑर्डर करू लागले. ग्रुपमधले मेंबर वाढू लागले. खवय्यांनी पदार्थांबद्दल आणि जोशीकाकूंबद्दल सांगायला सुरुवात केल्यावर मार्केटिंग होऊ लागलं. एवढा प्रतिसाद पाहून आशीषला खूप आनंद झाला, पण या वयात आई आपल्याला आधार देण्यासाठी मेहनत करतेय याचंही दुःख त्याला वाटत होतं. 9 नोव्हेंबर 2023 साली आशीषने आपल्या दुकानाला ‘जोशी आईंचे पंचामृत’ हे नाव देऊन आईच्या अथांग मेहनतीला दुकान समर्पित केलं.
वयाच्या 68व्या वर्षीदेखील शोभाकाकू सगळयांना गरमागरम भजी, सूप, पराठे, पॅटीस, मटार करंजी, अळूवडी, कोथिंबीर वडी, दहीवडे… खाऊ घालत आहेत. व्हाट्सअप ग्रुपवर मेन्यू पडताच आशीषला भरमसाट ऑर्डर्स सुरू होतात. शेवटी त्याला आजचा मेनू संपला असंही सांगावं लागतं. त्यातही शोभाकाकू काहीतरी करून वेगळा पदार्थ देण्याचा प्रयत्न करतात. हीच त्यांची खरी खासियत आहे.
शोभाकाकूंना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, “पूर्वजांनी ही दुकानाची वास्तू आम्हाला दिली ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठी ही सगळी मेहनत आहे. कारण त्यांचेच आशीर्वाद आज आम्हाला कायम संकटामधून बाहेर काढतात. आशीष हे दुकान टिकवण्यासाठी जी धडपड करतो त्यात माझा एक खारीचा वाटा म्हणून मी माझ्या घरगुती पदार्थांचा व्यवसाय चालू ठेवला. ग्राहकांना पदार्थ आवडतात हीच आमच्यासाठी पेचपावती आहे.’’ शोभाकाकूंना व आशीषला त्यांच्या व्यवसायात मोलाची साथ लाभली ती तृप्ती, विद्या, मेघा, प्रियांका ताई व प्रथमेश दादा यांची. पंचामृतामुळे नैवेद्याच्या ताटाची जशी शोभा वाढते तशीच या आई-मुलाच्या मेहनतीचे फळ म्हणजेच ‘जोशी आईंचे पंचामृत!’ आयुष्यात आलेल्या प्रत्येक टप्प्यातल्या अडचणींना हसतमुखाने, मेहनतीच्या जोरावर सामोरे जात आई-मुलाची ही जोडी आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. शोभा काकू व आशीषसारख्या असंख्य कुटुंबीयांना मानाचा मुजरा!
[email protected] (लेखक युटय़ूब शेफ आहेत.)