धोक्याचा तीन नबरचा बावटा! गेट वे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए लाँच सेवा बंद

खवळलेला समुद्र, खराब हवामान आणि विविध बंदरांत धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासूनच गेट वे-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोटी बंद असल्याने प्रवासी व कामगारांना रेल्वे, एसटी, बस, खासगी वाहनाने कामाचे ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे.

खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा गुरुवारी विविध बंदरांत लावण्यात आला. त्यामुळे खबरदारी म्हणून गेट वे ऑफ इंडिया-एलिफंटादरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे निरीक्षक एन. एस. कोळी यांनी दिली. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली आहे. विविध सागरी मार्गावरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय होत आहे.

व्यावसायिकाचा रोजगार बुडाला

बेटावर लेणी पाहण्यासाठी दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. मात्र बोटी बंद असल्याने पर्यटकांना माघारी परतण्याची वेळ आली आहे. एलिफंटा बेटावर एकाही पर्यटकाला लेण्या पाहण्यासाठी जाता आलेले नाही. पर्यटकांअभावी मात्र एलिफंटा बेटावरील शेकडो व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे.

मासळीचे भाव गगनाला

खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक मासळी बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. हजारो प्रवासी व पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा उतरून सागरी मार्ग पूर्ववत सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.