‘त्या’ नराधम पुजाऱ्यांना फासावर लटकवा ! ठाण्यात शिवसेनेच्या रणरागिणींचे जनआक्रोश आंदोलन

मनःशांतीसाठी मंदिरात गेलेल्या निष्पाप अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर अमानुष अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करणान्या नराधम पुजाऱ्यांना फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी आज शिवसेनेच्या रणरागिणींनी केली. पुजाऱ्यांनी केलेले हे कृत्य अतिशय घृणास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारे असून या नराधमांचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून त्यांना कड़क शिक्षा करा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला पदधिकाऱ्यांनी केली आहे. हत्या झालेली अक्षता लाडकी बहिण नाही का, असा सवाल देखील शिवसेनेने मिंधे सरकारला केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेनेच्या राणगिणींनी जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी महेश्वरी तरे, ज्योती कोळी, वासंती राऊत, वैशाली शिंदे, प्रमिला भांगे, अनुजा पांजरी, रेखा पाटील, कांता पाटील, नीलिमा शिंदे, मंजिरी ढमाले, अनिता प्रभू, सुप्रिया गावकर, नंदा कोवळे, स्नेहा पगारे, राजश्री सुर्वे, संपदा उरणकर, अनिता हिलाल, नैना सुर्वे, शुभांगी तावडे, योगिनी चौंबळ, संगीता साळवी, अंजली अहिरे, प्रज्ञा सावंत, अपर्णा कदम, सविता धुमाळ, पौर्णिमा लाड, आरती मोरे, संतोषी उबाळे, वैशाली मोरे, गील चव्हाण, अमृता पवार उपस्थित होते.

चहात भांगेच्या गोळ्या टाकल्या

कौटुंबिक वादानंतर अक्षता म्हात्रे या मनःशांतीसाठी नेहमीप्रमाणे डायघर येथील घोळ गणपती मंदिरात गेल्या होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या तिथेच बसून राहिल्या. दुपारचे जेवणही तिथेच केले. याचा गैरफायदा मंदिरातील तीन परप्रांतीय पुजाऱ्यांनी घेतला. या नराधमांनी भांगेच्या गोळ्या टाकून अक्षता यांना चहा दिला. बेशुद्ध झाल्यावर नराधमांनी आळीपाळीने अक्षतावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यानंतर अक्षता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण निर्दयी पुजाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण करून जमिनीवर आपटले. आपल्या कुकर्माचा भंडाफोड होईल या भीतीने त्या सैतानांनी गळा आवळून अक्षताला संपवले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी अक्षता म्हात्रे हिच्या माहेरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अक्षताचे आई-वडील, भाऊ व नातेवाईकांना दिलासा दिला. यावेळी आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, वासंती राऊत उपस्थित होत्या.