
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात बदलाचे वारे वाहत असून राज्यातील विधानसभा निवडणुकीतही निश्चितच परिवर्तन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना कोणाचेही नाव न घेता याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असा जबरदस्त टोला लगावला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये नुकतेच एक विधान केले होते. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा झाली. काही लोकांमध्ये मानवता नाही. या लोकांनी आधी खरे मनुष्य बनले पाहिजे. काही लोक मानव असताना सुपरमॅन बनू पाहतात. अलौकिक शक्ती असल्याचे म्हणत ते अलौकिक बनू पाहतात. पण तो तिथेच थांबत नाही. त्याला वाटते आपण देव बनले पाहिजे, असे विधान केले होते. भागवत यांच्या या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोहन भागवत यांनी काय म्हटले, याची मला कल्पना नाही. ते कोणाबद्दल बोलले असावेत, ते जनतेला माहित आहे. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचेच लोक वक्तव्य करत आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणाबाबतही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बनावट ओळख देत नागरी सेवेत रुजू होण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकरविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याची केंद्राने गंभीर दखल घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. पूजा यांनी त्यांचे, आई- वडिलांचे नाव, स्वतःचे छायाचित्र, स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, पत्ता हे सारे बदलले. स्वतःची खोटी ओळख देत परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे यूपीएससीने म्हटले आहे. हे देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.