
किराणा दुकानदार ते कोट्यवधी रुपयांच्या कंपन्यांचे मालक असा प्रवास करणारे भाजपचे माजी आमदार यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असला तरी त्याचा तपास योग्य दिशेने झाला नाही. या गुन्ह्यातून मेहता यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी पोलिसांनी न्यायालयात अ-समरी दाखल केली. मात्र पोलिसांच्या या कारनाम्यावर न्यायालयाने जोरदार आक्षेप घेऊन हे प्रकरण गांभीर्याने घ्या आणि व्यवस्थित तपास करा, असे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे मेहता यांच्यासह पोलिसांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली नरेंद्र मेहता यांना निर्दोष दाखवण्याचा खटाटोप पोलिसांच्या अंगलट पोलिसांचा हा डाव सामाजिक कार्यकर्ते राजू गोयल यांच्यामुळे हाणून पडला आहे.
भाजपचे माजी आमदार, तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता आणि त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत लोकायुक्त यांच्या आदेशान्वये 10 मे 2016 रोजी खुली चौकशी लावण्यात आली होती. त्यात तब्बल सहा वर्षांनंतर 19 मे 2022 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र मेहता हे ऑगस्ट 2002 पासून 2017 पर्यंत मीरा-भाईंदर महापालिकेत नगरसेवक होते. त्यांनी महापौर, विरोधी पक्षनेते, प्रभाग समिती अशी उपभोगली. 2014 पासून 2019 पर्यंत मीरा- भाईंदर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी पद व सत्तेचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उभी केली आहे. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन, सेव्हन इलेव्हन कम्युनिकेशन, सेव्हन इलेव्हन कॉर्पोरेशन आदी कंपन्या त्यांच्या असून त्यात ते व कुटुंब मोठे भागधारक आहेत, तर त्यांनी पत्नी सुमन मेहता यांना साडेचार कोटींची विदेशी लॅम्बोर्गिनी गाडी भेट दिली आहे. अपघात झाला तेव्हा या गाडीवरून टीकेची झोड उठली होती.