बसमध्ये चढताना हातातील सोन्याची बांगडी कापली पण…, 72 वर्षीय आजीने चोरांना घडवली अद्दल

कळव्याच्या खारेगाव येथील 72 वर्षीय आजी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्यासाठी घरातून निघाल्या. स्टॉपवर त्या बसची वाट पाहात उभ्या होत्या. टीएमटीची बस येताच त्या आत शिरू लागल्या. तेवढ्यात गर्दीतून आवाज आला.. आजी, जरा नीट इकडून चढा. त्याचवेळी चोरट्याने डाव साधत त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कापली. तोपर्यंत बस सुरूही झाली होती. त्यांनी आरडाओरड करताच थोड्याच अंतरावर चालकाने बस थांबवली. सुदैवाने त्यांना गस्तीवरचे पोलीस दिसले आणि पोलिसांना सोबत घेऊनच पुन्हा त्या खारेगावच्या बस स्टॉपवर येऊन घडकल्या. त्यांना पाहताच चोरट्यांची चांगलीच बोबडी वळली व ते पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईलपाठलाग करून दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या. चोरट्यांना अद्दल घडवणाऱ्या या बहाद्दर आजीबाईंचे नाव गीता पवार असे असून या धाडसाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नागोठण्यात राहणाऱ्या गीता पवार याखारेगावमध्ये आपल्या मुलीकडे आल्या होत्या. स्वामी समर्थ मठात जाण्यासाठी गुरुवारी खारेगाव बस स्टॉपवर त्या उभ्या होत्या. त्यांच्या हातात अंदाजे पाच तोळे वजनाच्या दोन बांगड्या होत्या. अंबरनाथहून आलेल्या विशाल गायकवाड व विलास गायकवाड हे दोन भावंडे असलेल्या चोरांची नजर त्यावर पडली आणि गर्दीचा फायदा घेत मोठ्या शिताफीने एक सोन्याची बांगडी लांबवली. आजी बसमध्ये चढत असताना चोरांनी हातचलाखी करीत त्यांना गंडा घातला. दुसरे सावज टिपण्यापूर्वीच…चोरट्यांना वाटले की आजी काही परत येऊ शकणार नाहीत. त्यामुळे आपली चोरी पचली असे समजून दोघेही दुसरे सावज टिपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात आजी पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी आल्याचे बघताच चोरट्यांची बोबडीच वळली. दोघेही चोर पळून जाऊ लागले. पण पोलिसांनी पाठलाग करून पकडले. 72 व्या वर्षीही गीता पवार यांचे धाडस व चपळाई बघून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. याप्रकरणी विशाल व विलास यांना कळवा पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.