वर्धा – पावसाची रिपरिप; नदी-नाल्यांना पूर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर

वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यांतील मौजा देरडा ते सावंगी (दे) येथील धाम नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच मारडा-विखणी आणि मारडा-कळमना रस्ता देखील बंद आहे.

मुसळधार पावसाचा फटका कळमना येथील शेतकऱ्यांनाही बसला आहे. शेतीमध्ये नदी, नाल्याचे पाणी आले आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, मंगरूळ नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ताही रस्ताही बंद झाला आहे. पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, नागपूर जिल्हयातील उमरेड तालुक्यात असलेल्या नांद धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी धरणाचे 7 दरवाजे 35 से.मी. ने उघडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.

वर्ध्याच्या लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर दिसून आल्याने लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे लाल नाला धरणाचे 5 दरवाजे 5 से.मी. ने उघण्यात आले असून या धरणातून 12.12 घनमीटर प्रती सेकंदनुसार विसर्ग सुरू आहे. यामुळे लाल नाला, पोथरा नदि, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर पोथरा धरण हे 85 टक्के भरलेले असून आज रात्रीपर्यंत 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोथरा नदीला पूर आला असून सावंगी, सायगव्हाण, पिंपळगाव, लोखंडी या गावाचा संपर्क तुटला आहे. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.