
>> नरेंद्र डुंबरे
सेवादलाचे मुंबईचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम. या निमित्ताने पंढरीच्या प्रवाहात सामाजिक समतेचा आणि पारमार्थिक समतेचा विचार रुजवत ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या विचाराने अवघी सृष्टी दुमदुमली.
दिनांक 7 जुलै. ठिकाण बारामती. वेळ सकाळी सहाची. तुकाराम महाराजांच्या दिंडीतील सहभागी वारकऱयांनी सणसरच्या दिशेने प्रस्थान ठोकले होते. आम्ही दिंडी क्र. 261 चे सहभागी वारकरीही आपल्या पद्धतीने सुरू झालो. दिंडीत पुण्या-मुंबईचे अनेक पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आपला सहभाग नोंदवत होते. या प्रयोगाचे नाव होते ‘एक तरी वारी अनुभवावी!’ हा प्रयोग जन्मला अकरा वर्षांपूर्वी. सेवादलाचे मुंबई अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी प्रथम ही संकल्पना मांडली. त्यावर ह.भ.प. व पत्रकार श्री. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. त्यामध्ये माझ्यासहित इतरही अनेक कार्यकर्ते, पुरोगामी संघटना, संस्था यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे आपला वाटा उचलला.
ही वारी परंपरा 800 वर्षे इतकी जुनी आहे. गेल्या आठशे वर्षांमध्ये त्यामध्ये उत्तरोत्तर छोटेमोठे बदल घडत गेले, जसे की तुकाराम पुत्र नारायण महाराजांनी वारीचे रूपांतर पालखीत केले. दरम्यान, शितोळे सरदारांच्या सेवेत असणारे हैबतबुवा आरफाळकर यांनी या वारीला शिस्त लावून उत्तमरीत्या संघटित केले. ते सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात अडकवून पंढरपूरला जात असत. नंतर शितोळे सरदारांनी त्यांना सर्व कुमक पुरविली व वारीचे भव्यदिव्य रुपडे साकार झाले.
या हैबतबुवांच्या संदर्भातील एक घटना अशी की, एका भिल्ल राजाला मूल होत नव्हते. परिणामी गादीला वारस नव्हता. त्यासाठी एका तांत्रिकाने त्यांना नरबळी देण्याचे सुचविले. त्या वेळेस हे हैबतबुवा काही भिल्लांच्या सापळ्यात अडकले. त्यांना त्या भिल्ल राजासमोर उभे केले गेले. त्यांचा नरबळी द्यायचा म्हणून त्यांना एका खांबाला जखडण्यात आले. हैबतबुवांनी माऊलींचा धावा केला अन् चमत्कार घडला. राजाच्या गर्भवती पत्नीस मुलगा झाला. त्याच्या राज्याला वारस मिळाला. हैबतबुवांची सुटका झाली. येथून पुढील आयुष्य त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेत वेचण्याचा पण केला आणि ते पुढे तसेच जगले.
तर हा पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक संचित असून गेल्या आठशे वर्षांपासून ते सतत प्रवाही आहे, निर्मळ आहे. ज्ञानेश्वरादी भावंडांना सनातनी परंपरेने शुद्र ठरविल्याने, आळंदीला वैदिक पूर्वी केव्हाच पूजाअर्चा करीत नव्हते; पण 1930/40 नंतर वारीची भव्यता, आकार पाहून सनातन्यांची छाती दडपली. त्यांनी आळंदीतील गुरवांना हाकलून आपला पूजापाठ सुरू केला.
या संप्रदायाला दिशा देताना नामदेव म्हणाले होते की, ‘न पढावे वेद नको शास्त्र बोध नामाचे प्रबंध पाठ करा.’ पुढे नामदेवांनी ‘नामरूपी पंचमवेदां’ची स्थापना केली. रूढी, प्रथा, व्रतवैकल्ये, कर्मठपणा, विशिष्ट जातीलाच वेदाध्ययनाचा अधिकार याविरुद्ध बंड पुकारून परमार्थाचा मार्ग सर्वसामान्यांसाठी मोकळा केला. ईश्वराची भक्ती समान पातळीवर आणून भक्तिमार्ग सर्वसामान्यांसाठी सुलभ केला.
नामदेवांच्या वरील शिकवणीचे प्रत्यंतर वेगवेगळ्या दिंडय़ातून दिसत होते. अत्यंत सामान्य कष्टकरी, फाटक्या लोकांचा तो मेळा सतत हलत होता. चेहऱयावर कोणताही तणाव नाही. टाळमृदंगाच्या गजरात संतांचे अभंग गात, नाचत, हर्षभरित हा मेळा पुढे सरकत होता. भोवताली आषाढाचे नयनरम्य वातावरण त्याला उंची देत होते. अखंड हिरवाई, वातावरणातले भिजलेपण, त्याला वारकऱयांची सहिष्णुता, नम्रता, प्रेमभाव, माणुसकीचा ओलावा याची जोड मिळून एकूण वातावरण भारित होऊन गेले होते. आनंदाला भरते येत होते. येथे जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, द्वेष, मत्सर याला थारा नाही. वारकरी सोहळ्यात सर्व जातीधर्माचे लोक सहभाग घेतात. वारकऱयांना मदत करतात.
गेल्या आठशे वर्षांत कधीही या सोहळ्यात अनुचित प्रकार घडला नाही. कधीही पोलिसांची गरज निर्माण झाली नाही. वारकरी इतर धर्मीयांची स्थळे आल्यास त्यांचा आदर करतात. शांतपणे तेथून मार्गक्रमण करतात.
धर्मासंबंधी विवेकानंद काय म्हणतात पहा… ज्याला विधवेचे अश्रू पुसता येत नाहीत किंवा अनाथ अर्भकाच्या तोंडात अन्नाचा घास घालता येत नाही, असा धर्म किंवा ईश्वर मानायला मी क्षणभरसुद्धा तयार नाही. हे त्यांचे उद्गार त्यांच्या विशाल सामाजिक जाणिवेचे स्पंदन आहे व ही त्यांची भूमिका भक्ती चळवळीच्या किती समीप जाणारी आहे हेही दिसून येते. याच भूमिकेतून पूर्वी नामदेवांनी अठरापगड जातींच्या संतांचा मेळ घातला. द्वेष, मत्सर, भेद, शोषण, वर्णवर्चस्व यावर हल्लाबोल केला व भक्तीचा मार्ग दाखवला. काळय़ा विठ्ठलाच्या ममतेच्या सावलीत त्या वाळवंटात समग्र संतमेळा जमा केला. त्यांचे समकालीन संत चोखोबा, दामाजीपंत, गोविंदबुवा, संत लतीफबुवा, श्री. गैबीसाहेब, संत सावता, नरहरी सोनार, गोरोबा, भागवत, जगन्मित्र नागा, संत जोगा परमानंद, राका कुंभार, संत सेना महाराज या सर्वांची मोट बांधली व त्या पंढरपूरच्या वाळवंटात सांस्कृतिक, सामाजिक परिवर्तनाची नांदी केली. ज्ञानेश्वरांचा अद्वैती विचार व नामदेवांचा भक्ती विचार यांच्या मिलाफाचा सर्व संतांवर व समाजावर खोलवर परिणाम झाला. याचमुळे सामाजिक समतेचा आणि परमार्थिक समतेचा विचार त्यांच्या अभंगातून वारंवार डोकावतो. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या विचाराने अवघी समष्टी दुमदुमली.
एकमेकांवर परिणाम घडवून आणणारा प्रभावी संवाद नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांच्या अभंगातून दिसून येतो. त्यांचे आत्मचरित्रपर अभंग, भक्तांचा स्वतशी, दुसऱया व्यक्तीशी आणि अंतिमत विठ्ठलाशी तसेच व्यापक पातळीवर समाजाशी चाललेला संवाद आहे. संवाद साधणे हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे, कीर्तन परंपरा हे त्याचे वाहन आहे.
यादवांच्या काळात एका बाजूने मोगल आणि दुसऱया बाजूने वैदिकांनी सामान्यांचा छळ मांडला, त्यातून त्यांचे चौफेर शोषण केले. या पार्श्वभूमीवर संतांच्या भक्ती संप्रदायाने सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे बीजारोपण करून या परिस्थितीशी लढा उभारला. संतांचा ईश्वर हिमालयातील गिरिकंदरात दडून बसलेला नाही; तर तो अर्धपोटी राहणाऱया आणि अज्ञान, दारिद्रय़ व आळस यांच्या पाशात सापडून अगतिक झालेल्या आपल्या अगणित दीन आणि दलित बांधवांत त्यांना ईश्वर दिसतो.
यादवकालीन परिस्थिती आजही ओढवलेली आहे. वारकरी संप्रदायाची ही भक्ती चळवळ सुधारणावादी असून सनातन्यांनी तिच्यावर कब्जा केला आहे. या चळवळीच्या मूल्यांवर त्यामुळे आघात होत आहे. या चळवळीला या मगरमिठीतून मोकळे करून तिच्या मूळ मूल्यव्यवस्थेकडे नेणे हे एक आव्हान आहे. ते ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ यानिमित्ताने पुरोगामी चळवळीतील धुरीण, कार्यकर्ते यांनी शरद कदम व ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराजांच्या साथीने नवप्रवाह निर्माण करून तसा प्रयत्न केला आहे. तो अधिक व्यापक रूप धारण करत जावो, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना.