
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रामध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाऊस अक्षरश: कोसळत असून तलावातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणारा ‘तुळशी तलाव’ ओव्हरफ्लो झाला आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणारा तुळशी तलाव शनिवारी सकाळी साडे आठ वाजता पूर्ण भरून वाहू लागला. गेल्या वर्षी देखील 20 जुलै रोजीच मध्यरात्री दीडच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2022 व वर्ष 2021 मध्ये 16 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर 2020 मध्ये 27 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
⛈️ मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव आज (२० जुलै २०२४) सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.#MumbaiRains #mybmcupdates pic.twitter.com/qUKxDyV0Ym
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2024
तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती
- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.
- या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1879 मध्ये पूर्ण झाले.
- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.
- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा 804.6 कोटी लीटर एवढा असतो. (8046 दशलक्ष लीटर)
- तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.
मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या तुळशी तलाव तुडुंब झाला असून अप्पर वैतरणा 9.54 टक्के, मोडक सागर 58.29 टक्के, तानसा 76.58 टक्के, मध्य वैतरणा 37.31 टक्के, भातसा 40.11 टक्के आणि विहार 62.92 टक्के भरला आहे. सातही तलावातील पाणीसाठी मिळून 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही.