
मुंबईमध्ये शनिवारी पहाटेपासून तुफान पाऊस पडतोय. या पावसामुळे दाणादाण उडालेली असतानाच आता ग्रँट रोड येथे म्हाडाच्या एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँट रोड पश्चिम येथे स्लेटर रोडवर असणाऱ्या ‘रुबिनिसा मंझिल’ नावाच्या म्हाडाच्या चार मजली इमारतीच्या बाल्कनीचा आणि तिसऱ्या व चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या इमारतीला म्हाडाकडून नोटीसही जारी करण्यात आली होती. शुक्रवारी रात्रीची संततधार आणि शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीचा काही भाग खचला आणि पडला अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Mumbai Rain Update : ग्रँट रोड येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळली pic.twitter.com/UNzt4jQtnh
— Saamana (@SaamanaOnline) July 20, 2024
दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोकं अडकल्याची माहिती मिळताच बीएमसीचे अधिकारी, प्रशासन, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. चौघांनाही तात्काळ भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींपैकी एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर उपचार सुरू आहेत.