वाघनखं हा श्रद्धेचा विषय, लोकांची फसवणूक मिध्यांच्या अंगलट येणार; संजय राऊत यांचा इशारा

sanjay-raut

लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधून ऐतिहासिक वाघनखं महाराष्ट्रात आली असून आजपासून ती जनतेला पाहता येणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं आणून मतांसाठी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न मिंधे सरकारचा आहे. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असून शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारचा आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला. वाघनखं हा श्रद्धेचा विषय असून लोकांची फसवणूक करणे मिध्यांच्या अंगलट येणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

वाघनखांवरून शिवसेनेला नकली वाघ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली. बेईमान लोकं हे बोलत असून खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद आम्हाला नकली बोलणार? ज्यांनी शत्रुशी हातमिळवणी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आम्हाला नकली बोलणार? मुळात वाघनखं ही ऐतिहासिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखरच ती वाघनखं वापरली असतील तर आम्ही त्यांना प्रणाम करतो. पण इतिहासतज्ज्ञ आणि लंडनचे म्युझियमही सांगते की ही तीच वाघनखं आहेत याची खात्री नाही. याविषयी कुणीही खात्रीने सांगू शकणार नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला. भाजपवाले एकेकाळी मतांसाठी गंगाजलच्या बाटल्या विकत होते. 1991 नंतर देशभरात गंगाजलच्या बाटल्या विकल्या जात होत्या. कुठलेही पाणी भरायचे आणि गंगाजल म्हणून घरोघर विकायचे. त्याप्रमाणेच मिंधे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात महाराष्ट्राच्या मनात असलेल्या श्रद्धेचा व्यापार चालवला आहे. वाघनखं ही मतं मागायची वस्तू आहे का? राजकारणा करण्याची वस्तू आहे का? असा सवाल करत वाघनखं ही ऐतिहासिक आहेत. श्रद्धेचा विषय आहे. मिंधे सरकार लोकांना फसवतंय आणि ही फसवणूक त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाशी संबंध काय? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही इतिहासाशी संबंध आला आहे का? भाजपचा संबंध ना स्वातंत्र्य संग्रामाशी आला, ना राज्याच्या ऐतिहासिक अशा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आला, ना आणीबाणीतल्या संघर्षाशी आला. आणीबाणीमध्ये समाजवादी पक्षाचे लोकं तुरुंगात होते. संघाचे लोकं माफी मागून बाहेर आलेले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले

वाघनखांचा अपमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला. मिंधे सरकार इतिहासाचा अपमान करत आहे. स्वत: डुप्लिकेट असल्याने त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण आहे. आम्हाला छत्रपतींच्या वाघनखांविषयी अत्यंत आदर आहे. आमची श्रद्धा आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं.. वाघनखं… करणाऱ्यांनी आधी स्वत:ची नखं कापावी, मग वाघनखांवर बोलावे, अशी बोचरी टीकाही राऊत यांनी केली.

दरम्यान, कोरोना काळात मोदी सरकारने मृतांचा आकडा लपवल्याचे समोर आले आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या गंगा मातेने मला दत्तक घेतले असे मोदी म्हणतात, त्या गंगेतून ज्या प्रकारे प्रेतं वाहत होती ते पाहिल्यावर सत्य काय आहे हे जगाने पाहिलंय, असे राऊत म्हणाले.