
महाविकास आघाडीचे 31 खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासंदर्भात लोकसभेत आपल्या प्रयत्नांची शिकस्त करतील. आजपासून 70 दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निश्चितच महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
आपल्याच शेतातील उत्पादित मालाला योग्य किंमत मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील कार्यक्रमातून दाखवून दिले. केंद्र आणि राज्य सरकारला शेती व शेतकऱ्यांविषयी आस्था नाही, अशी टीकाही त्यांनी केली. अकोले येथील बाजारतळावर लोकनेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दशरथ सावंत होते. यावेळी खासदार नीलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माकपचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे, काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, सुनीता भांगरे, अमित भांगरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, महेश नवले, विनोद हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकारला शेती व शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव ठरवून शेतमालाची किंमत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. परंतु, या सरकारकडून तसे होत नाही. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केला. दूध व कांद्यासह उत्पादित शेतमालाला रास्त किंमत मिळावी. पण हमीभाव देण्याची सरकारची तयारी नाही.
…त्याला योग्य ठिकाणी बसवा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोलेतील आमदार डॉ. किरण लहामटे यांचा नामोल्लेख टाळून शरद पवार म्हणाले, मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. माझ्या शब्दाखातर तुम्ही डॉक्टरला निवडून दिलं, ती माझी चूक झाली. सुरुवातीला त्याने इथं भाषण केलं, मी शरद पवारांना कधी सोडणार नाही. नंतर मुंबईत गेला व तिकडे जाऊन बसला. ज्याला बसायचं कुठं ते कळत नाही, त्याला योग्य ठिकाणी तुम्ही बसवा.