घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, भावेश भिंडेच्या याचिकेवर उत्तर द्या

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर दोन आठवडय़ांत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही ‘देवाची करणी’ असल्याचा अजब दावा करीत भिंडेने गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे.

भिंडेच्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आरोपी भिंडेला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी त्याला नोटीस जारी केलेली नाही. अशा स्थितीत अटक बेकायदा असल्याचा भिंडेचा दावा विचारात घेतला पाहिजे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. आरोपीला बेकायदा अटक केली असेल तर त्याला तातडीने सोडले पाहिजे. त्यावर पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.