
लोकसभा कामकाजविषयक सर्वपक्षीय समितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. या समितीत मिंधे गट आणि अजित पवार गटाला स्थान मिळालेले नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेमलेल्या या समितीत सत्ताधारी भाजप, तेलुगू देसम, संयुक्त जनता दल आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि महाराष्ट्रातून एकमेव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्याआधी ही समिती नेमण्यात आली आहे. या 14 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी स्वतः ओम बिर्ला असतील. सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल कॉंग्रेस), पी. पी. चौधरी (भाजप), लवू श्रीकृष्ण देवरायालू (तेलुगू देसम), निशिकांत दुबे (भाजप), गौरव गोगोई (काँग्रेस), संजय जयस्वाल (भाजप), दिलेश्वर कामत (संयुक्त जनता दल), दयानिधी मारन (द्रमुक), वैजयंत पांडा (भाजप), अरविंद सावंत (शिवसेना), के. सुरेश (काँग्रेस), अनुराग ठाकूर (भाजप), लालजी वर्मा (समाजवादी पक्ष) या सदस्यांचा समितीत समावेश आहे. अधिवेशन काळात दर आठवडय़ाला समितीची बैठक होते. सभागृहासमोर येणाऱ्या विषयांचा प्राधान्यक्रम व त्यासाठीचा वेळ यावर समितीच्या बैठकीत सहमतीने निर्णय केला जातो.