
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात अखेर यूपीएससीने कारवाई केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आपली निवड का रद्द करू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत यापुढे नोकरीसाठी कोणतीही शासकीय परीक्षा देण्यास यूपीएससीने बंदी घातली आहे.
यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्यावर परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ओबीसी उमेदवाराला नऊ वेळा परीक्षा देता येते. मात्र, पूजा खेडकर यांनी गैरमार्गाचा अवलंब करत त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली. फसवणूक करत परीक्षा पद्धतीचे नियम डावलून यूपीएससीमध्ये दाखल झाल्याने त्यांच्या विरोधात यूपीएससीने पोलिसांत गुन्हा दाखल करून फौजदारी खटल्याची कारवाई सुरू केली आहे.
पूजा खेडकर हिने ओळखपत्र बदलून आणि आईवडिलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई-मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सहीसुद्धा बदलल्याचे सखोल चौकशीत निदर्शनास आल्याचे यूपीएससीने म्हटले आहे.
पूजा खेडकरांनी वाशीम सोडले
पूजा खेडकर यांनी तब्बल 72 तासांनंतर वाशीममधील शासकीय विश्रामगृह सोडले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्या चौकशीला अद्याप हजर राहिलेल्या नाहीत. वाशीमहून त्या कुठे रवाना झाल्या याची माहिती मिळू शकली नाही.