ठसा – सुभाष दांडेकर

>> प्रशांत गौतम

शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंद्रधनूचे सप्तरंग भरून त्यांचे शालेय जीवन सप्तरंगी करणारे कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांनी मुंबईत नुकताच अखेरचा श्वास घेतला. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी उपकरणे आणि सर्व प्रकारचं साहित्य, कार्यालयीन उत्पादनं आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती करणारा कॅम्लिन हा उद्योग समूह होय. सुभाष दांडेकर हे चित्रकला साहित्य निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योग समूहाचे आधारस्तंभ होते. शालेय विद्यार्थ्यांना गणितीय उपकरणं म्हटलं की पेन्सिल, मार्कर, कंपास पेटी, रंगपेटी आठवत असेलच, त्यावर कॅमलची ठसठशीत मुद्राही आठवून बघा. आपल्या लक्षात येईल शालेय साहित्यासह अन्य कलाकारांना लागणारे कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती या समूहाने केली. जिद्द, चिकाटी, मेहनत यावर त्यांनी समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले, अर्थात हे करीत असतानाच दांडेकरांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान वापरले. उत्पादनातील प्रयोगशिलता, नावीन्य त्यांनी सातत्याने जपले. महत्त्वाचे म्हणजे कॅम्लिन हा ब्रँड तयार करीत असताना त्यांनी मूल्ये तर जपलीच; पण नव्याचाही ध्यास घेतला. श्रम घेणारे कर्मचारी त्यांच्यासाठी कायम महत्त्वाचे असत. आयुष्यात आजवर जे मिळाले, त्यावर ते समाधानी नसत, कारण आयुष्यात उंची गाठण्यासाठी ते प्रयत्नशील होते. 1931 साली वडील दिगंबर दांडेकर आणि काका जी. पी. दांडेकर यांनी कॅम्लिन समूहाची स्थापना केली. दिगंबरराव हे समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि लेखकही होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन प्रमुख गुण म्हणजे उद्योगप्रवणता आणि समाजाभिमुखता हे सांगता येतील. तोच वारसा सुभाषजींनी जोपासला व या समूहाला आधुनिक रूप देऊन नावारूपाला आणले. 1960 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी एम.एस.सी. केले आणि देशात परत आल्यावर आपल्या उद्योग समूहावर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांना विपणनाची जबाबदारी पार पाडणाऱया पत्नी रजनी यांची खंबीर साथ लाभली. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. चित्रकलेच्या साहित्याचा उद्योग त्यांनी तर नावारूपास आणला. चित्रकलेचे रंग साहित्य आणि कॅम्लिन असे जणू समीकरणच 1980 च्या दशकात तयार झाले होते. कॅम्लिन फाईन सायन्सेसचे संस्थापक व कोकयो कॅम्लिनचे अध्यक्ष या नात्याने दांडेकरांनी हजारो मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शाळकरी चित्रकार मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या शालेय चित्रकला स्पर्धा आणि त्यात दांडेकरांनी दिलेले ठळक योगदान कोण विसरू शकेल? कॅम्लिन आणि मुलांसाठीची चित्रकला स्पर्धा हे समीकरण आजही कायम आहे. शुश्रूषा सिटिझन्स को-ऑप. रुग्णालयाशी दांडेकर निगडीत होते. सिकॉमसारख्या अनेक उद्योग समूहाचे ते मार्गदर्शक होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. (medc) महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळात अध्यक्ष असताना त्यांची उल्लेखनीय कारकीर्द सांगता येईल. त्यांच्या संबंधित कार्याची दखल घेत दांडेकर यांना ‘गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र’, लाईफ टाईम अचिव्हमेंट अँवार्ड अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. गुणवत्तेच्या निकषावर दांडेकरांची कारकीर्द लक्षणीय ठरली आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन पोहचली, ती महाराष्ट्र आणि देशासाठी नक्कीच अभिमानास्पद ठरेल यात शंका नाही.