पंतप्रधानांच्या उंचीची खिल्ली उडवल्याने महिला पत्रकाराला साडे चार लाखांचा दंड

देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणे इटलीतील एका नामांकित वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पत्रकाराला 5 हजार युरो (जवळपास 4 लाख 55 हजार 569 रुपये) दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम जॉर्जिया मेलोनी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

जिउलिया कोर्टेस असे महिला पत्रकाराचे नाव आहे. ऑक्टोबर 2021मध्ये तिने पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासंदर्भात एक ट्विट केले होते. यात त्यांनी मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवली होती. याबद्दलही महिला पत्रकाराला 1200 युरो (1 लाख 9 हजार 336 रुपये) दंड ठोठावण्यात आला. ‘बॉडी शेमिंग’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 2021मध्ये मेलोनी आणि जिउलिया कोर्टेस यांच्या सोशल मीडियावर वादाचा भडका उडाला होता. त्यावेळी मेलोनी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. कोर्टेस यांनी सोशल मीडियावर मेलोनी यांचा एक मॉर्फ केलेला फोटो शेअर केला होता. मेलोनी यांच्यासोबत बेनिटो मुसोलिनीचा फोटो होता. यावर मेलोनी यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर कोर्टेस यांनी ही पोस्ट डिलिट केली, मात्र मेलोनी यांच्या उंचीची खिल्लीही उडवली होती.

“मेलोनी, तुम्ही मला घाबरवू शकत नाहीत. तुम्ही फक्त 4 फूटांच्या आहात. इतक्या लहान की दिसूही शकत नाहीत”, अशा शब्दात कोर्टेस यांनी मेलोनी यांची खिल्ली उडवली होती. हा अपमान सहन न झाल्याने मेलोनी यांनी तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टेस यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे.

दरम्यान, या शिक्षेविरोधात कोर्टेस या 90 दिवसांच्या आत अपिल करू शकतात. तर दुसरीकडे मेलोनी यांच्या वकिलाने दंड म्हणून मिळणारी रक्क धर्मादाय संस्थांना दान करणार असल्याचे म्हटले आहे.