
राज्यात पोलिसांमार्फत लोककलेची गळचेपी सुरू करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशा फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली. तसेच ‘यापुढे तमाशा व्यवसाय सुरू ठेवल्यास परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकीही लोकनाटय़ कला केंद्राच्या व्यवस्थापकाला दिली. पोलिसांच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
महाराष्ट्राला लोककलेची समृद्ध परंपरा आहे. असे असताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोकनाटय़ कला केंद्र बेकायदेशीरपणे बंद केले आहे. या कारवाईला उषा काळे यांनी ऍड. शैलेश खरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या फौजदारी रिट याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. याचिकेवरील प्राथमिक सुनावणीवेळी खंडपीठाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावर सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार खंडपीठाने 22 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे.
गेटवर पहारा ठेवून अडवणूक
आदल्या रात्री कला केंद्राच्या व्यवस्थापकाला धमकी दिल्यानंतर प्रभारी पोलीस आयुक्तांनी दुसऱया दिवशी कला केंद्राच्या मुख्य गेटवर पोलिसांचा पहारा ठेवला. हे पोलीस त्रिमूर्ती कला केंद्रामध्ये लोकांना प्रवेश करण्यापासून रोखू लागले, असे याचिकेत म्हटले आहे.