विशाळगडची दंगल पूर्वनियोजित कटच! ‘शिव-शाहू सद्भावना यात्रे’तून सामाजिक एकीचा संदेश

विशाळगडावर झालेली दंगल हा पूर्वनियोजित कटच होता. छत्रपती शिव-शाहूंच्या या पुरोगामी आणि सर्वधर्मसमभाव भूमीत सामाजिक शांततेसाठी दुसऱयांदा ‘सद्भावना यात्रा’ काढावी लागते, हे या शिंदे-फडणवीस सरकारचे सपशेल अपयश आहे. याचा जाहीर निषेध करीत, चार दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने आज ‘शिव-शाहू सद्भावना यात्रा’ काढून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विशाळगड पायथ्याशी झालेल्या दंगलीसंदर्भात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्ये अत्यंत बेजबाबदार आणि समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यात्रेत करण्यात आली.

रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. अतिक्रमणांशी संबंध नसलेल्या गजापूर-मुसलमानवाडीत समाजकंटकांनी दगडफेक व जाळपोळ करून अनेक घरे, वाहने, प्रार्थनास्थळांची तोडफोड केली. त्यामुळे जिह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने सामाजिक सद्भावना यात्रा काढण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळ येथून या यात्रेस सुरुवात झाली, तर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगता करण्यात आली.

समतेचे वातावरण मुद्दाम गढूळ करण्याचा प्रयत्न – खासदार शाहू महाराज

दीड वर्षात दोनदा कोल्हापुरात सद्भावना यात्रा काढण्याची वेळ आली. राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेलं समतेचं वातावरण कुणीतरी मुद्दामहून गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. विशाळगडावरील दंगल निश्चित थांबवता आली असती; पण ती थांबवली नाही म्हणून हे घडलं. तसंच आम्ही केलेल्या मदतीवरून चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आम्ही तिथे माफी मागण्यासाठी नाही, तर मदत करण्यासाठी गेलो होतो,’ असे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.

हिंदू खतरे में नाही, तर भाजप खतरे में – संजय पवार

‘विशाळगडासह सर्वच किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढावीत, याबाबत कोणाचेही दुमत नाही. पण विशाळगडाच्या पायथ्याशी झालेली दंगल राज्य सरकारकडून हेतुपुरस्सरच झाल्याचे स्पष्ट होते. तोडफोड करणारे लोक आभाळातून आले काय? त्यांना सोडले कसे?’ असे सवाल करीत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांचे कॉल डिटेल्स चेक केल्यास या दंगलीचा सूत्रधार समोर येईल. यातून ‘हिंदू खतरे में’ असल्याचे दाखविले जात आहे; पण हिंदू नव्हे, तर भाजपच खतरे में आहे. मतांसाठी हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तेसाठी भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले. तसेच याप्रकरणी पालकमंत्र्यांचा आवाज कोणी काढून टाकला? त्यांच्यात एवढा बदल कसा झाला? असा सवालही संजय पवार यांनी केला.