मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचे घर दीड हजारात चालेल का? असा रोखठोक असा सवाल करतानाच, बेरोजगारांना सहा ते दहा हजार रुपये सरकार देणार आहे मग लाडक्या बहिणीलाही 10 हजार रुपये द्या, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज मिंधे सरकारला सुनावले.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज असतानाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सरकार नवनव्या योजना आणत आहे. मध्य प्रदेशातील ‘लाडली बहीण’ योजनेची कॉपी करून ‘लाडकी बहीण’ योजना आणली. आता ‘लाडका भाऊ’ही आणला. बारावी पास आहे त्याला 6 हजार रुपये आणि पदवीधर बेरोजगाराला 10 हजार रुपये सरकार देणार आहे. मग लाडक्या बहिणीवर अन्याय का करता, तिलाही 10 हजार रुपये द्या आणि महाराष्ट्रात स्त्राr-पुरुष समानता असल्याचे दाखवून द्या, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सरकारचे कान टोचले. तसे झाले तरच महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगारांच्या आत्महत्या बंद होतील, असे ते म्हणाले.
शरद पवार नटसम्राट तर भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे कलाकार
शरद पवार आणि छगन भुजबळ भेटीबाबतही संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केले. छगन भुजबळ हे मोठे कलाकार आहेत. महाराष्ट्रात एक खुले रंगमंच आहे, ते फिरत राहते आणि छगन भुजबळांसारखे लोक फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भुजबळांनी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. बऱयाचदा रंग, रूप बदलून नाटय़ निर्माण करण्यात ते माहीर आहेत. भुजबळ का गेले? कसे गेले? यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणात त्यांना प्रतिष्ठा मिळालेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
विधानसभेत 280 जागा जिंकणार
निवडणूकपूर्व सर्वेक्षणात आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 280 जागा जिंकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. लोकसभेप्रमाणे ज्याची ताकद जिथे जास्त, जो जिंकू शकेल, त्यालाच तो मतदारसंघ मिळेल हे महाविकास आघाडीचे सूत्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.