सूर्या झाला रे, हिंदुस्थानच्या टी-20 कर्णधारपदाची माळ मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या गळय़ात

हिंदुस्थानच्या वेगवान क्रिकेटच्या कर्णधारपदाचा सस्पेन्स अखेर संपला. रोहित शर्माच्या टी-20 निवृत्तीनंतर त्याचा वारसदार म्हणून मुंबईकर सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. येत्या 26 जुलैपासून सुरू होणाऱया श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानचे टी-20 आणि वन डे संघ जाहीर करण्यात आले असून रोहित शर्माकडे वन डेचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचे उपकर्णधारपद असलेल्या हार्दिक पंडय़ाकडे नेतृत्व सोपवण्याची चर्चा सुरू होती, मात्र त्याची फिटनेस त्याच्या नेतृत्वाच्या आडवी आली. हिंदुस्थानी संघाचे अधिक काळ नेतृत्व करू शकेल, असे ध्येय समोर ठेवत बीसीसीआयच्या निवड समितीने सूर्यकुमारच्या फिटनेसला प्राधान्य दिले आणि आगामी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत तोच कर्णधार असे संकेत देत नेतृत्व सोपविले.

टी-20 मालिकेसाठी शुबमन गिल संघाचा उपकर्णधार असेल तर या संघात अधिक युवा खेळाडूंनाच प्राधान्य देण्यात आले आहे. हार्दिक पंडय़ा या संघात कायम असून ऋषभ पंतच्या साथीला संजू सॅमसनही यष्टिरक्षणाला असेल.
वन डे संघात रोहितकडे कर्णधार कायम असून विराट कोहलीसुद्धा खेळणार आहे. तसेच के. एल. राहुलला पुन्हा संधी मिळाली असून करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नसलेल्या श्रेयस अय्यरलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थानचा टी-20 संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, सिराज अहमद.

 हिंदुस्थानचा वन डे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, सिराज अहमद, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, हर्षित राणा.