कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टrका करत या दुर्देवी घटनेचा निषेध केला. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे, नुकसानग्रस्तांना सरकारने मदत करावी, हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत. विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे.
शाहू महाराजांच्या विशाळगडावरील ‘त्या’ फोटोचं सत्य समोर आलं; खोटा नॅरेटिव्ह सेट करणारे तोंडावर आपटले
राज्यातील कायदे सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत हे दुर्दैव आहे. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलिसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुले आम व्हीडीओवरून धमकी देतो पण त्याला सरकार का पकडत नाही असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्याचबरोबर अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडविला असता तर दुर्देवी घटना घडली नसती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भीतील चौकशीच्या मागणीचे पत्र वडेट्टीवार यांनी सरकारला दिले आहे.
View this post on Instagram