सायबर क्रिमिनल्सला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; छत्तीसगढमधून दोघांना, तर दिल्लीतून एकाला अटक

सायबर क्रिमिनल्सला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करून सिमकार्ड प्रोव्हायडर टोळीतील दोघांना छत्तीसगढ येथून अटक केली आहे. अफताब ढेबर व मनीषकुमार देशमुख अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच या सिमकार्डची दुबई, चायना, कमोडियासारख्या देशांमध्ये तस्करी करणाऱ्या हाफिज अहमद उर्फ भाईजान याला दिल्लीतून गजाआड केले आहे. या तिघांकडून पोलिसांनी 800 अॅक्टिव्ह सिमकार्ड, एक लॅपटॉप, दोन वायफाय राऊटर, 23 मोबाईल, 50 क्रेडिट/ डेबिट कार्ड, 20 चेकबुक, पासबुक व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सध्या ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतदेखील याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेल पथकाने तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने समांतर तपासाला सुरुवात केली. या पथकाने 16 गुन्ह्यांचा एकत्रित तपास करून सीडीआर व व्हॉट्सअॅपची माहिती मिळवली असता त्यांना वेगवेगळ्या राज्यातून 30 मोबाईलच्या मदतीने जवळपास 2 हजार 600 सिमकार्ड छत्तीसगढ येथील त्रिपुरा व इतर काही ठिकाणांवरून अॅक्टिव्ह केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अफताब व मनीषकुमार या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांची कसून चौकशी केली असता हे सायबर क्रिमिनल्स नसून त्यांना सिमकार्ड पुरवणारे प्रोव्हायडर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हे सिमकार्ड चायना, कमोडियासारख्या बाहेरील देशांमध्येदेखील पुरवत असल्याची कबुली दिली.

गुन्ह्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक

छत्तीसगढ येथून अटक केलेले दोघेही प्रोव्हायडर असून ते सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व फिंगरप्रिंटचा वापर करून त्यांच्या नावावर प्रत्येकी दोन किंवा चार सिमकार्ड अप्लाय करायचे. त्यानंतर अॅक्टिव्हेट केलेले विविध कंपन्यांचे सिमकार्ड राजस्थान, हरयाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ अशा ठिकाणी ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या टोळीला बाराशे ते दीड हजार रुपयांना विकल्याचे उघड झाले आहे.

तुमच्या नावावर किती सिमकार्ड जाणून घ्या!

फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी टॉफकॉप (tofcop) या वेबसाईटवरून तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत आणि त्यापैकी किती अॅक्टिव्हेट आहेत याची माहिती मिळू शकते. आपल्या नावावर अन्य सिमकार्ड आढळून आल्यास तत्काळ पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर आमिष दाखवून भुरळ घालणाऱ्या किंवा भीती दाखवून लुटणाऱ्या गुन्हेगारांना बळी पडू नका. तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्वरित १९३० नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन सायबर सेलचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी केले आहे.