
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने नवी मुंबईत कारवाई करून ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. एनसीबीने कारवाई करून 31 किलो मेफ्रेड्रोन जप्त केले. याप्रकरणी सुफियान खान नावाच्या एकाला एनसीबीने अटक केली. तो ड्रगच्या सिंडिकेटमध्ये सक्रिय होता.
शिवडी येथून एकजण ड्रग सिंडिकेट चालवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. एनसीबीने काही दिवस शिवडी येथे फिल्डिंगदेखील लावली. त्यानंतर एनसीबीला सुफियानची माहिती मिळाली. सुफियान हा ड्रग सिंडिकेटमधील महत्त्वाचा तस्कर आहे. तो शिवडी येथून ड्रग सिंडिकेट चालवत असायचा. संबंधित यंत्रणांनी कारवाई करू नये म्हणून सुफियान हा वारंवार मोबाईल नंबर आणि त्याची जागा बदलत असायचा.
अखेर एनसीबीला सुफियानची माहिती मिळाली. एनसीबीने नवी मुंबईच्या वाशी येथे सापळा रचून सुफियानच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 31.5 किलो मेफ्रेड्रोन जप्त केले. जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे लाखो रुपये आहे. त्याच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. सुफियानच्या इतर साथीदारांचा एनसीबी शोध घेत आहेत.