
राज्यातील सर्व शाळांतील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून 22 जुलै ते 30 ऑगस्ट यादरम्यान ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रम राबवला जाणार असून या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘महावाचन उत्सवा’साठी तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्य, लेखक व कवीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात चालना देणे आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा व भाषासमत कौशल्याला चालना देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.
– शालेय शिक्षण विभाग रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवणार आहे.
– या उपक्रमासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून वेब पोर्टल तयार केले जाणार आहे.
– या उपक्रमामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करतील आणि त्याचे वाचन करतील.
– सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार मांडतील व तो विचार लिखित स्वरूपात ‘महावाचन उत्सव 2024’ च्या पोर्टलवर अपलोड करतील.
– यासाठी 150 ते 200 शब्दमर्यादा असेल. वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एक मिनिटाचा व्हिडीओ ऑडिओ क्लिप या पोर्टलवर विद्यार्थ्यांना अपलोड करावी लागेल.