धारावी पुनर्वसन प्रकल्प : मुंबई बचाव समिती मंत्रालयावर धडकणार

धारावीसह मुंबईतील मोक्याच्या सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या जागा अदानीच्या घशात घालण्याच्या मिंधे सरकारच्या कटकारस्थानाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेली मुंबई बचाव समिती लवकरच मंत्रालयावर धडक देणार आहे. दरम्यान, धारावी प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांसहित मुंबईमधील विविध विषयांवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक शनिवार, 20 जुलैला दुपारी 4.30 वाजता कुर्ला पूर्व येथील नेहरूनगरमधील गणेश हॉलमध्ये होणार आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील सर्वच पात्र-अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीमध्येच करण्याबरोबरच धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील जागांचे हस्तांतरण थांबवा, अशी मागणी मुंबई बचाव समितीने नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी आणि या विषयांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणीही समितीने निवेदनात केली होती. मात्र, या निवेदनाला सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. धारावीसह मोक्याच्या ठिकाणची सुमारे 1 हजार 803 एकर जागा मिंधे सरकारने अदानीच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. या धारावीसह मुंबईकरांचा प्रचंड विरोध आहे.