आदेश पाळण्यास टाळाटाळ कराल, तर कारवाई करू; प्रदूषण नियंत्रण मंडळाला हायकोर्टाची सक्त ताकीद

खाणकामाविरोधात तक्रारी प्राप्त होऊनही कारवाई न करणाऱया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मंगळवारी उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ कराल, तर याद राखा. तुमच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी सक्त ताकीद मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली.

सांगली जिह्यातील बेलंकी (ता. मिरज) गावातील शेतकऱयाच्या शेताजवळ क्रशर मशीनद्वारे अनेक वर्षे खाणकाम सुरू आहे. परिणामी, शेताचे प्रचंड नुकसान होत असून दगडखाणीचा व्यवसाय बंद करण्यासाठी आणि नुकसानभरपाई देण्यासाठी निर्देश द्या, अशी विनंती करीत दिलीप कदम या शेतकऱयाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.