एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांची 11 ऑगस्टला प्रवेश परीक्षा, 24 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर ऑप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी 24 जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

दोन्ही अभ्यासक्रम यूजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांच्या पात्रता, शुल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज विद्यापीठाच्या https://mumidol.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून सादर करता येईल.

एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमासाठी 720 एवढी प्रवेश क्षमता असून एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर ऑप्लिकेशन) या अभ्यासक्रमासाठी 2000 एवढी प्रवेश क्षमता आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई व यूजीसीने सीडीओईच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग या तीन विषयात एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऑप्लिकेशन) हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे.