पंढरपुरात भक्तिसंगम, विठुरायाच्या पदस्पर्शासाठी 28 तास प्रतीक्षा; 15 लाख भाविकांनी घेतले दर्शन

>> सुनील उंबरे

हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।1।।
पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी।।2।।
संत संग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।3।।
चंद्रभागे स्नान। तुका मागे हेचि दान।।4।।।

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनोमन आळवीत 15 लाखांहून अधिक वारकऱयांनी आषाढी एकादशीचा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. भल्यापहाटेपासून चंद्रभागेच्या स्नानासाठी वारकऱयांची गर्दी उसळली होती. पदस्पर्श दर्शनाला 28 तास लागत होते.

चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते आज भाविकांनी ओसंडून वाहत होते. टाळ-मृदंगाचा मधुर निनाद आणि त्याच्या ठेक्यावर घुमणाऱया ‘ज्ञानबा तुकारामा’च्या नामजपाने अवघी पंढरीनगरी भक्तिरसात चिंब झाली होती. एकादशीच्या पवित्रदिनी श्री विठ्ठल-रखुमाईचे पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली. देवाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांना 25 ते 28 तास लागले. वारकऱयांची परंपरागत वारी पोहोच होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे अडीच वाजता सपत्नीक शासकीय महापूजा केली.

यंदा राज्यातील बऱयाच भागांत समाधानकारक पाऊस पडून पेरण्या झाल्याने वारीच्या गर्दीत विक्रमी वाढ झाली आहे. चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, नदीचे घाट, भक्तिसागर, मठ, मंदिरे, धर्मशाळा, भक्त निवास, मोकळी मैदाने आदी ठिकाणी ‘राम पृष्ण हरी जयजय राम पृष्ण हरी’ हा जयजयकार ऐपू येत होता.

भल्यापहाटेपासून दिंडय़ा, पालख्या प्रदक्षिणा घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. भाविकांची स्नानाला जाण्याची घाई आणि स्नान झालेल्या भाविकांची नगर प्रदक्षिणा घेण्याची लगबग असल्याने महाद्वार घाट, पुंभार घाट, कासार घाट, दत्त घाट आदी ठिकाणी भाविकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. पोलीस यंत्रणा भाविकांना सुलभ चालता यावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी डोळय़ात तेल घालून काम करीत होती.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचा रथ काढला जातो. या रथावर खारीक व खोबरे उधळले जाते. असंख्य भाविकांना थेटपणे विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवच रथयात्रेच्या माध्यमातून दर्शन देतात अशी भाविकांची धारणा असते. या रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. जिल्हा पोलीस विभागाकडून ‘माऊली स्का@ड’ ही संकल्पना राबवण्यात आली.

यात्रेत चोऱया रोखण्यासाठी ‘दामिनी’ पथक तैनात होते. सुमारे आठ हजार अधिकारी व पोलीस कर्मचारी वारीकरिता तैनात करण्यात आले होते. पाच ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवला होता. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार मिळत होते.

पंढरपूर येथे गोपाळपूर, तीन रस्ता व वाखरी, 65 एकर या चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. याचा भाविकांनी लाभ घेतला आहे.

आषाढी यात्रेकरिता यंदा विशेष रेल्वेगाडय़ा पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सुमारे पाच हजार एसटी बसेस भाविकांच्या सेवेकरिता धावत आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार करण्यात आली असून त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत.

मानाचे वारकरी यांचा सत्कार

नाशिक जिल्हातील सटाणा तालुक्यामधील अंबासन येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे (55), आशाबाई बाळू अहिरे 50) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱयांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.

भक्तिसागर बहरले

चंद्रभागेच्या पैलतीरी असलेल्या भक्तिसागर येथे सुमारे चार लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथे वीज, पाणी, शौचालये, प्रथमोचार पेंद्र तसेच पोलीस सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण आहे. तंबू, राहुटय़ांमधून भजन, कीर्तन, प्रवचनात भाविक दंग झाले होते.

बुधवार असल्याने मुक्काम वाढला

श्री विठ्ठलाचा वार हा बुधवार म्हणून ओळखला जातो. बुधवारी वारकरी मंडळी पंढरपूर सोडत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून वारकरी एकादशीचे व्रत पूर्ण केले की फराळ करून पंढरीचा निरोप घेतात. मात्र आज बुधवार असल्याने बहुतांश वारकऱयांनी आपला मुक्काम वाढवला आहे.

बाजारपेठेत मोठी उलाढाल

धार्मिक विधीच्या सोपस्कारानंतर भाविकांनी प्रसाद, पुंपूबुक्का, अगरबत्ती, धार्मिक पुस्तके, भजनातील वाद्ये आदी खरेदीसाठी गर्दी केली. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. प्रासादिक साहिंत्याची विक्री जास्त होताना दिसून येत आहे. एकादशी, द्वादशी तसेच गोपाळकाल्यापर्यंत बाजारपेठेत मोठी उलाढाल होईल, अशी माहिती स्थानिक व्यापाऱयांनी दिली.

श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, पुणे यांना 75 हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरू बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना 50 हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.