नव्या हंगामात कारखान्यांना 1.37 लाख हेक्टर ऊस, सांगलीत यंदा दीड हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले

सांगली जिल्ह्यात मागील वर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच पाण्याची टंचाई त्यामुळे ऊस लागवडीला फटका बसणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. कमी पाऊस आणि पाणीटंचाईचा फटका बसला नसल्याचे स्पष्ट झाले. यंदाच्या गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांना तब्बल 1 लाख 37 हजार 103 हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दीड हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्टय़ात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आणि वाकुर्डे उपसा सिंचन योजना चालू झाल्या आहेत. त्यामुळे ऊसशेतीसह फळे, भाजीपाल्यासह उसाचे क्षेत्र वाढत आहे. तूर, मूग, सोयाबीनलाही हमीभाव नसल्यामुळे याचेही दर वारंवार कमी होत आहेत. या सर्वांपेक्षा ऊसपिकात धोका कमी आणि शासनाने एफआरपीचा दर तरी किमान निश्चित केला आहे. या सर्वांचा विचार करूनच शेतकरी उसाची लागवड करत आहेत. वाढत्या ऊसक्षेत्राचा शेतकऱयांबरोबरच साखर कारखानदार आणि शासनालाही तेवढाच धोका आहे. परंतु शेतकऱयांना एफआरपी देणे हे कायद्यानेच कारखानदारांना बंधनकारक आहेत.

जिल्ह्यात गतवर्षी म्हणजे 2023-24 गाळप हंगामात 1 लाख 35 हजार 688 हेक्टवरील उसाचे गाळप करण्यात आले. जिह्यात मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने दडी मारली. त्यानंतर पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे याचा परिणाम आडसाली हंगामातील ऊस होणार असल्याची शक्यता होती. मात्र, या दरम्यान, कृष्णा आणि वारणा नदीला आणि विहिरी आणि कूपनलिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱयांनी आडसाली ऊस लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे यंदा गाळपास जाणाऱया आडसाली हंगामात गतवर्षीच्या तुलनेत 1944 हेक्टरने वाढ झाली आहे.

पाणीटंचाईमुळे दुष्काळी पट्टय़ात खोडवा धरला नाही

n गतवर्षी पूर्व हंगामात उसाचे 19 हजार 35 हजार हेक्टर, तर नुकत्याच संपलेल्या हंगामात उसाचे 17 हजार 666 हेक्टर क्षेत्र होते. दुष्काळी पट्टय़ातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांत पूर्व हंगाम आणि सुरू हंगामातील उसाची लागवड होते. या तालुक्यात पाणीटंचाई सप्टेंबर महिन्यापासून भासू लागली. त्यात परतीचा पाऊस अपुरा झाला. या साऱयाचा फटका पूर्व हंगाम आणि सुरू हंगामातील ऊसलागवडीवर बसला आहे. आटपाडी, जत हे दोन्ही तालुके दुष्काळी असून, या भागात पूर्व हंगामी आणि चालू हंगामातील उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तसेच पाणीटंचाई असल्याने शेतकऱयांनी खोडवा घेतला नाही.

वाळवा, मिरज, शिराळय़ाला पाणीटंचाईचा फटका

– वाळवा, मिरज आणि शिराळा तालुक्यात पूर्व हंगाम, सुरू हंगामातील लागवडही केली जाते. तसेच खोडवा पीक ठेवण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतात. मात्र, या तालुक्यातील शेतकऱयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असल्याने या हंगामातील उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. पूर्व हंगामाचे 483, तर सुरू हंगामाचे 2467 हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. तर तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा आणि आटपाडी या तालुक्यांत खोडव्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र

तालुका क्षेत्र हेक्टरमध्ये

मिरज 19772

तासगाव 9787

पलूस 15243

कडेगाव 23087

वाळवा 31361

शिराळा 9198

खानापूर 15763

आटपाडी 2533

कवठेमहांकाळ 4722

जत 5638

एकूण 1,37,103