रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील गैरसोयींबाबत आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना जाब विचारला. जिल्हा रूग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रूग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, एक्स-रे च्या फिल्म नाहीत अशी दयनीय अवस्था जिल्हा रूग्णालयाची झाल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. रामानंद यांना आज शिवसैनिकांनी घेराव घातला . यावेळीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. जिल्हा रूग्णालयात भूलतज्ञ नाहीत, वयोवृध्द रूग्णांना केस पेपरसाठी ज़िना चढून जावे लागते, त्यांना केसपेपर अपघात विभागात देण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. एक्स-रे च्या फिल्म नसल्याने एक्स-रे पेपरवर दिले जातात ते बंद करा आणि आजपासून एक्स-रे साठी फिल्म उपलब्ध करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा रूग्णालयात प्रचंड अस्वच्छता असल्याबाबतची तक्रार करण्यात आली.
जिल्हा रूग्णालयात सध्या फक्त 55 नर्स कार्यरत आहेत. नर्सची 90 पदे रिक्त आहेत ती त्वरीत भरली जावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे,
तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे,महिला संघटक मनिषा बामणे,विजय देसाई,साजिद पावसकर,बिपीन शिवलकर,नितीन तळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दररोज सोनोग्राफी सुरू ठेवा
जिल्हा रूग्णालयात आठवड्यातून फक्त गुरूवारी सोनोग्राफी केली जाते. तसेच त्यादिवशी फक्त तीस रूग्णांची सोनोग्राफी होते. त्यामुळे अनेकांना प्रतिक्षा यादीत रहावे लागते याबाबात संताप व्यक्त करत दररोज सोनोग्राफी सुरू ठेवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली. तसेच खासगी रूग्णालयात अवाच्या सव्वा दर आकारले जातात त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे नियंत्रण नसल्याबाबतची खंत शिवसैनिकांनी व्यक्त करताना तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांनी खासगी रूग्णालयांच्या सेवांचे दराचा आदेश काढावा आणि ते दरपत्रक खासगी रूग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.