भाजपलाच आता अजित पवार गटाची गरज नाही! RSS शी संबंधित साप्ताहिकातील लेखावर NCP ची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक पार पडल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार आणि त्यांच्या गटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे. आरएसएसशी संबंधित मुखपत्र, साप्ताहिकांमधून लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले जात आहे. भाजपचे कार्यकर्तेही जाहीरपणे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी करताना दिसतात. आरएसएसशी संबंधित ‘विवेक’ या साप्ताहिकातूनही अजित पवार गटावर पराभवाचे खापर फोडण्यात आले. यावर अजित पवारांनी मौन बाळगले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी ‘एएनआय’शी बोलताना या विषयावर परखड शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरएसएसशी संबंधित मुखपत्र किंवा साप्ताहिकामध्ये दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याविरोधात भाष्य करण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाला आता अजित पवार किंवा त्यांच्या गटाची गरज नाही. भाजप फक्त दुसऱ्यांचा पक्ष आणि कुटुंब फोडतो. त्याद्वारे काही प्रमाणात मतांचा लाभ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या या राजकारणाला झिडकारले. जनतेनेच खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता हे दाखवून दिले.

अजित पवार यांना सोबत घेऊन फायदा होण्याऐवजी नुकसान झाल्याची उपरती लोकसभेच्या निकालानंतर भाजपला झाली असावी. त्यामुळे भविष्यात त्यांना अशा लोकांना एकत्र घ्यायचे नसेल. पण भाजपच नाही तर अजित पवार गटातील लोकांनाही या गटाबाबत साशंकता वाटत आहे. अजित पवार बारामतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला लीड मिळवून देऊ शकले नाहीत. याचाही विचार भाजपने केलाच असणार, असेही क्रास्टो म्हणाले. बारामतीमध्ये अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात होत्या. तिथे सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.

संघाशी निगडित साप्ताहिकातून अजित पवार लक्ष्य, भाजपच्या खराब कामगिरीचं खापर त्यांच्या गटावर फोडलं

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसच्या ऑर्गनायझर या इंग्रजी मुखपत्रानंतर आता साप्ताहिक विवेकमध्येही अजित पवार यांच्याविरोधात लेख लिहिण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवारांमध्ये नक्की काय सुरू आहे? याबाबत मी ठामपणे काही सांगू शकत नाही. याबाबत ते दोन पक्षच बोलू शकतात, असे त्या म्हणाल्या.