क्रिकेटविश्व हादरलं! हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची पत्नी व मुलांसमोर गोळ्या घालून हत्या

हिंदुस्थानचा संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही उभय संघात 3 टी-20 आणि 3 एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वीच एक दु:खद बातमी आली असून यामुळे क्रिकेटविश्व हादरले आहे.

श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशन (वय – 41) याची मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गॉले जिल्ह्यातील अंबालांगोडा येथे राहत्या घरी धम्मिका याला गोळ्या घालण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे पत्नी आणि दोन मुलांसमोरच हल्लेखोराने धम्मिका याला ठार केले. श्रीलंकन मीडियाने याबाबत वृत्त दिले असून पोलीस अद्याप आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. त्याचा शोध सुरू असून या गोळीबारामागील कारणांचाही पोलीस तपास करत आहेत.

Dhammika Niroshana हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. त्याने 2001 ते 2004 या काळात गॉले क्रिकेट क्लबकडून प्रथम श्रेणीचे 12 सामने आणि ‘लीस्ट-ए’चे 8 सामने खेळले. यात त्याने 300 धावा आणि 19 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली. सन 2000 रोजी त्याने श्रीलंकेच्या अंडर-19 संघाकडून पदार्पण केले आणि जवळपास दोन वर्ष तो अंडर-19 कसोटी आणि एक दिवसीय सामने खेळला.

धम्मिका निरोशन याने श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचे 10 लढतीत नेतृत्व केले. फारवीज महरूफ, अँजेलो मॅथ्यूज आणि उपुल थरंगासारखे खेळाडूंचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली होती. पुढे हेच खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही चमकले. मात्र धम्मिकाचे नशिब उजळले नाही. डिसेंबर 2004मध्ये तो आपला अखेरचा सामना खेळला होता.

पंड्याला टी-20 चे कर्णधारपद मिळणार; बीसीसीआयचे संकेत

वर्ल्ड चॅम्पियनशी श्रीलंका भीडणार

दरम्यान, टी-20 वर्ल्डकप विजेत्या हिंदुस्थानचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात येत्या 27 ते 30 जुलैदरम्यान तीन टी-20 सामन्यांची मालिका पाल्लेकेले येथे खेळविली जाणार आहे. त्यानंतर 2 ते 7 ऑगस्टदरम्यान वन डे मालिका खेळविली जाणार आहे. याच मालिकेत हिंदुस्थानला टी-20 संघाचा नवा कर्णधार मिळेल. तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच हिंदुस्थानचा संघ मैदानात उतरेल.