पनवेलच्या कुटुंबाचा शिरवळजवळ अपघात, रिक्षा उलटून सासऱ्याचा मृत्यू; सून जखमी

कोरेगाव येथे डॉक्टरांकडून तपासणी करून परत जाताना शिरवळ येथे रिक्षा पलटी होऊन सासऱयाचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुलाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

वसंत हरीभाऊ पोळ (वय 65, रा. बोरीव, ता. कोरेगाव) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे, तर प्रीती नवनाथ पोळ असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. पोळ कुटुंबीय हे पनवेल येथे राहण्याकरिता आहे. वसंत पोळ आजारी असल्याने त्यांना कोरेगाव येथील एका डॉक्टरकडे तपासणीसाठी त्यांचा मुलगा नवनाथ व सून प्रीती हे घेऊन गेले होते. कोरेगावमध्ये वडिलांना तपासून मुलगा, वडील व सून हे तिघेही रिक्षाने पुन्हा पनवेलकडे निघाले होते. पहाटे 2.30च्या सुमारास रिक्षा शिरवळ गावच्या हद्दीत आली असता नवनाथ यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती बॅरिकेटला धडकून उलटली. या अपघातात विजय पोळ यांना गंभीर दुखापत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच, शिरवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमी झालेल्या वसंत पोळ यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचबरोबर जखमी सून प्रीती पोळ यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.