kolhapur News : शिवसेनेच्या ओळखपत्रामुळेच जीव वाचला!

>> शीतल धनवडे

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्त म्हणून ज्यांनी विशाळगडाच्या दुर्गम भागात येणाऱया शिवभक्तांना धर्माच्या पलीकडे जाऊन सेवा दिली, त्या गजापूर-मुसलमानवाडीत समाजकंटकांनी रविवारी हिंसाचार केला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. जीवाच्या आकांताने आबालवृद्धांनी जंगलात आसरा घेतला. याच वेळी या दंगलखोरांच्या तावडीत सापडलेले शिवसेनेचे निष्ठावंत 55 वर्षीय हसन गोलंदाज हे केवळ शिवसेनेच्या ओळखपत्रामुळे वाचले. ओळखपत्रावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे पाहून हल्लेखोरांनी या शिवसैनिकाला सोडले. मात्र, त्यांच्या डोळ्यांसमोर राहते घर उद्ध्वस्त करून हिंसाचाराच्या भयानकतेची दाहकता दाखवून दिली.

40 वर्षे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक म्हणून समाजकार्य करताना आजपर्यंत कोणताही धर्म आडवा आला नाही. पण रविवारी विशाळगडाच्या पायथ्याशी ज्यांचा अतिक्रमणांशी कसलाही संबंध नसलेल्या गजापूर गावात मात्र धर्म आडवा आला.

विशाळगडाला जाताना ‘आशीर्वाद की दुवा’ ही पानटपरी चालवून उदरनिर्वाह करणारे 55 वर्षीय हसन गोलंदाज या शिवसैनिकाची वेदना चटका लावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आजपर्यंत काम करीत आलो. पण हिंसाचार करणाऱया जमावाने माझ्याकडे असलेले शिवसेनेचे ओळखपत्र पाहून मला जिवंत सोडल्याची भावना हसन गोलंदाज यांनी व्यक्त केली. मात्र, ‘मोठय़ा कष्टाने उभारलेल्या आपल्या घराची कौले, पत्रे आणि प्रापंचिक साहित्य जमावाने उद्ध्वस्त करताना पाहून अश्रू अनावर झाले,’ असेही त्यांनी सांगितले.