शाहू महाराजांची विशाळगडाला भेट, गजापुरातील हिंसाचारग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या

ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकांच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आज भेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील घरेदारे उद्ध्वस्त होऊन संसार उघडय़ावर पडलेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.

शासनस्तरावर आवश्यक ती मदत आणि पोलीस प्रशासनाकडून यात जबाबदार असणाऱयांना कठोर शासन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ग्रामस्थांना दिली. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी करीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेमींना रविवार, 14 जुलै रोजी विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. यावेळी एकत्र आलेल्या समाजकंटकांच्या जमावाने गडाच्या पायथ्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गजापूर-मुसलमानवाडी या वस्तीत अक्षरशः हैदोस घातला. दगडफेक करीत घरांची नासधूस व जाळपोळ केली. गावातील एकही घर या हल्ल्यातून सुटले नाही. चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे भयभीत आणि उघडय़ावर पडलेल्या या गावकऱयांना दिलासा देण्यासह येथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी गावाला भेट दिली.

पांढरपाणी येथेच पोलिसांनी जिल्हा प्रशासनाचा बंदी आदेश असल्याचे सांगून गाडय़ांचा ताफा रोखून पुढे जाण्यास मज्जाव केला. अखेर दोन तासांच्या तणावानंतर प्रशासनाने नमते घेत पुढे जाण्यास परवानगी दिली. गजापूर येथे उद्ध्वस्त झालेली घरे आणि प्रार्थनास्थळांची पाहणी केली. यावेळी रेश्मा प्रभुलकर, नसीरा महात, आयेशा पर्बुलकर, मुजरीम मालदार, शाहीन पर्बुलकर, मदिना महात, तमन्ना महात, सईदा पर्बुलकर, हीना पर्बुलकर आदी महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.

सर्वच गडांवरील अतिक्रमणे काढणार – देवेंद्र फडणवीस

विशाळगडावरचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने झाले पाहिजे, नियम पाळून झाले पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल? याला आमची प्राथमिकता आहे. विशाळगडच नाही तर सगळय़ा गडांवरचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे ही सरकारची भावना आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.