
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली’… अशा थेट मनाला भिडणाऱया शब्दांत शोषित, कष्टकरी लोकांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडणाऱया कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी झाली. परंतु हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचे असल्याचे चोराला समजल्यावर त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने भावनिक चिठ्ठी लिहून सुर्वे यांच्या कुटुंबियांची माफी मागितली. इतकेच नाही तर त्याने चोरलेल्या वस्तू परत आणून दिल्या.
रायगड जिह्यातील नेरळ पूर्व परिसरात गंगानगर येथील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ या घरात चोरी झाली. त्या घरात त्यांची मुलगी सुजाता घारे आणि जावई गणेश घारे राहतात. ते दहा दिवसांसाठी विरारला मुलाकडे गेले होते. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी साधून चोराने त्यांच्या घरावर डल्ला मारला. शौचालयाची खिडकी पह्डून घरात प्रवेश केला. चोराने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळेच्या वस्तू, भांडी आदी साहित्य नेले. दोन ते तीन दिवस हा चोर घरातील वस्तू एक एक करून चोरून नेत होता. दरम्यान चोरटय़ाला घरात काही भिंतीवरील पह्टो, सत्काराच्या ट्रॉफी, पुरस्कार, सर्टिफिकेट दिसून आल्यानंतर त्याला हे प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांचे घर असल्याचे समजले. नारायण सुर्वे यांचा जीवन इतिहास डोळ्यासमोर उभा राहताच चोरटय़ाने भावूक होत चोरलेला टीव्हीही परत आणून ठेवला. घराच्या भिंतीवर एक मजकूर लिहून चोर पळून गेला.
भिंतीवर काय लिहिले?
या मजकुरात चोराने लिहिलं आहे की, मला माहिती नव्हते, की हे कविवर्य नारायण सुर्वे यांचे घर आहे, नाहीतर मी चोरी केलीच नसती. मला माफ करा, मी जी वस्तू घेतली आहे ती मी परत करेन, मी टीव्ही पण नेला होता तो आणून ठेवला आहे, सॉरी.’ असे लिहिले.