काँग्रेसच्या दगाबाज सात आमदारांवर निलंबनाची कारवाई? मुंबईतील 3 तर मराठवाडय़ातील 4 आमदारांचा समावेश

विधान परिषद निवडणुकीत दगाफटका करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. मुंबईतील 3 तर मराठवाडय़ातील 4 आमदारांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यांची नावे काँग्रेस पक्षश्रेष्ठाRकडे पाठवण्यात आली असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आहे.

विधान परिषद निवडणुकीत कोणाला कोणी मतदान करायचे, प्राधान्यक्रम कसा द्यायचा हे काँग्रेसने निश्चित केले होते. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 30 मते द्यायची तर शिवसेना उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना 7 मते काँग्रेसने द्यायची असे ठरले होते. सातव यांना प्रत्यक्षात 25 मते पडली. त्यांची एकूण 5 व नार्वेकर यांची 2 मते फुटली. त्यावरून काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे सिद्ध होते. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठाRकडे पाठवण्यात आला आहे. याच संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यास दिल्लीला गेले आहेत.

सहा वर्षांसाठी निलंबित होणार
दगाफटका करणाऱ्या सात आमदारांत मुंबईतील 3 आणि मराठवाडय़ातील 4 आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. 19 जुलै रोजी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबईत येणार आहेत. त्या भेटीपूर्वीच निलंबनाची कारवाई होईल अशी माहिती आहे. गद्दार आमदारांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले जाऊ शकते, असेही सांगण्यात येते.