मुंबईकरांना खड्डय़ांमुळे होणारा मनस्ताप सुरूच असून या वर्षी पावसाळय़ात जूनपासून सर्व रस्त्यांवर मिळून एकूण 5 हजार 396 खड्डे पडल्याचे समोर आले आहे. यातील 5194 खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र यामुळे मुंबईकरांना मात्र खड्डय़ांतून प्रवास करावा लागल्याने पालिकेच्या कामाबद्दल संताप व्यक्त होत असून खड्डय़ांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत अडीच हजार किमीचे रस्ते येतात. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पालिकेकडून दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. या वर्षीदेखील खड्डे बुजवण्यासाठी 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेकडून आखले जात आहे. मात्र सध्याचे उपलब्ध असलेले रस्ते आणि राज्य सरकारच्या रस्त्यांची जबाबदारीही पालिकेवर आल्याने खड्डय़ांची संख्या आणखी वाढली आहे. जून महिन्यापासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह मुंबईभरातून खड्डे पडल्याच्या तब्बल 5194 तक्रारी आल्या आहेत.
खड्डय़ांचे ‘टॉप फाइव्ह’ विभाग
के/पश्चिम – अंधेरी
जी / उत्तर – दादर, माटुंगा
पी दक्षिण – गोरेगाव
पी/उत्तर – मालाड
एन विभाग – घाटकोपर
असे पडले खड्डे
पूर्व द्रुतगती
मार्गावरील खड्डे – 1089
पश्चिम द्रुतगती
मार्गावरील खड्डे – 1865
आता अधिकाऱ्यांना नोटीस
– रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने खड्डय़ाची तक्रार आल्यानंतर 24 तासांत बुजवला जावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
– या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्याने नोटीस बजावण्यासही सुरुवात केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
– यामध्ये जोगेश्वरी जंक्शन येथील खड्डय़ांसह अजून दोन ठिकाणी अशी दिरंगाई निदर्शनास आल्यामुळे नोटीस बजावली असून स्पष्टीकरण मागितल्याचे ते म्हणाले.