प्रासंगिक – महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीकः विठू माऊली

>> संजय नहार

कोणत्याही चांगल्या उपक्रमामधील सातत्य खूप महत्त्वाचे असते. एखादा चांगला सामाजिकसांस्कृतिक उपक्रम अखंडितपणे 25 वर्षे सुरू राहणे यालाही तसा विशेष अर्थ आहे. शरद कला क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला जाणारा विठू माऊलीहा कार्यक्रमही रौप्य महोत्सव साजरा करतो आहे. सांस्कृतिक विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या या उपक्रमाच्या निमित्ताने

मी ‘वंदे मातरम’ संघटनेचे काम करत असताना 1986 मध्ये पंजाबमधल्या घुमान गावात आम्ही गेलो होतो. त्या गावात गेल्यावर आमच्या लक्षात आले की, इथे एकही अतिरेकी नाही. दहा किलोमीटरवर एक गुरुद्वारा होता. तेथील प्रत्येक घरात शहीद भगतसिंग आणि गुरू गोविंदसिंग यांचा एक-एक फोटो होता. मी तिथल्या लोकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, भगतसिंग आणि गुरू गोविंदसिंग हे आमचे हिरो आहेत. आपण अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे हा संदेश त्यांनी आम्हाला दिला. आम्ही मेलो तरी चालेल, पण धर्मासाठी शहीद होऊ. म्हणूनच देशभक्ती आमच्या नसानसांत आहे आणि इथला एकही मुलगा अतिरेकी नाही. आम्हाला आश्चर्य वाटलं. आम्ही त्यांना विचारलं की, हे कसं शक्य आहे? त्यावर ते म्हणाले की, हे संत नामदेव महाराजांचे  गाव आहे.

आम्हाला आश्चर्य वाटलं. कारण संत नामदेव महाराज हे तर महाराष्ट्रातले. जिथून पाकिस्तान खूप जवळ आहे अशा गावात एकही अतिरेकी नाही, पण तिथे संत नामदेव महाराज पोहोचलेले आहेत. आचार्य विनोबा भावेंनी एकदा पंजाबला भेट दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, सिकंदराला सैन्याच्या बळावर पंजाब जिंकता आला नाही, पण तो संत नामदेवांनी प्रेमाने जिंकला. महाराष्ट्राच्या संत परंपरेचे हे वैभव आहे. प्रेमाने जग जिंकता येतं हा संदेश ती देते. त्याच भूमिकेतून आम्ही संत नामदेव पुरस्कार देण्याची सुरुवात केली. आम्ही संत सुफी संदेश यात्राही काढली. ती खूप गाजली. या सर्व चळवळीमध्ये लक्ष्मीकांत खाबिया आणि मी नेहमीच सोबत असायचो. लक्ष्मीकांत खाबिया हे व्यक्तिमत्त्वच मुळात समाजात समरस होणारे आहे. त्यामुळे त्याने तिथेच न थांबता पुढे जाऊन शरद क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. लक्ष्मीकांत आयुष्यात दोन जणांना देव मानतो. एक म्हणजे संत तुकाराम आणि दुसरे म्हणजे शरद पवार. लक्ष्मीकांत खाबिया हे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत. त्यांचा भाऊ माझ्या वर्गात होता. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. आमचे ऋणानुबंध अनेक वर्षांचे आहेत.

एखाद्या माणसाने आयुष्यभर समाजासाठी काही काम केलं तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कृतज्ञता व्यक्त करत असताना संतांचा विचार करून महाराष्ट्रात समाजासाठी काम करणाऱ्या सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न ‘विठू माऊली’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. जैन धर्मामध्ये एक नवकार मंत्र आहे. नवकार मंत्र हा व्यक्तीपूजक नसून गुणपूजक आहे. तो अरिहंतांना मानतो, आचार्यांना मानतो, तो शिक्षकांना मानतो. त्यांना नमस्कार करताना त्यांचे गुण माझ्या अंगात येऊ दे असं तो म्हणतो. जिथे कुठे चांगलं आहे ते सगळं माझं आहे, असं तो म्हणतो आणि याच विचारांवर ही लक्ष्मीकांत यांची संस्था अखंडपणे काम करते आहे मला वाटते.

जगामध्ये वारी ही अशी गोष्ट आहे, जी पदयात्रा करून तिथूनही आपल्याला परत प्राचीन परंपरांकडे जावं लागतं. म्हणजे पायी चाललं पाहिजे, विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे, पण यातसुद्धा अनेक मतप्रवाह आहेत. प्रत्येकाला विठ्ठल आपला वाटतो. मग तो शैव असो किंवा वैष्णव असो, आणि सांगायला आनंद होतो की, हेच महाराष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे.  तमाशाने समाज बिघडत नाही आणि कीर्तनाने समाज सुधारत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा मराठी माणूस असाच आहे. हे चक्र कधीही बिघडणार नाही याची जाणीव ठेवणं म्हणजेच हा ‘विठू माऊली’ कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनामागची लक्ष्मीकांत यांची भूमिका वेगळी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

राजकारणात असतानाही आपल्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की, या सर्व गोष्टी या ‘विठू माऊली’ कार्यक्रमातून साध्य होतात. या कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहणं आणि भाषेशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन होणे यापेक्षा मोठी दुसरी कोणती गोष्ट असू शकत नाही. आपलं भाषेवरील प्रेम हे केवळ शब्दांतून न येता कृतीतून आलं पाहिजे याचं स्मरण म्हणजे ‘विठू माऊली’ हा कार्यक्रम.

(लेखक सरहद्द, पुणेचे संस्थापक आहेत.)