वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. गाडीवर सरकारी दिवा लावण्यावरून तसेच दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद सुरू असतानाच त्यांच्या आईने प्रसारमाध्यमांची प्रतिनिधी आणि पोलिसांना धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचाही व्हिडीओची चर्चा होती. त्यामुळे खेडकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा याबाबतची चर्चा होत आहे.

पूजा खेडकर यांच्या वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना मसुरी येथे 23 जुलैच्या आत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम जिल्हा प्रशासनाला खेडकर यांच्या जिल्ह्यातील प्रशिक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान सुसज्ज स्वतंत्र कक्षाची मागणी, कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या ‘अँटी चेंबर’चा ताबा, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या होत्या.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली केली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाची तक्रार दाखल केल्याने याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.