श्री क्षेत्र नृसिंहवाडीत या वर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा; स्नानासाठी भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी पहाटे 4 वाजता या वर्षांतला पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादूकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारादून बाहेर पडते. याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी अनेकभाविकांनी हजेरी लावली होती.

नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडते. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेतात, यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हटले जाते. मंगळवारी पहाटे 4 वाजता हा दक्षिण द्वार सोहळा झाला. मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले. सोमवारी रात्रीपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत. पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच होणार आहेत. रोज रात्री साडेसात नंतर धूपाआरती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने पाणी वाढले आणि सोमवारी दत्त मंदिरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मंदिर चारहीबाजूने नदीच्या पाण्यात गेले. त्यामुळे सोमवारी रात्री दक्षिणद्वार होण्याची शक्यता निर्माण झाली आणि शेकडो भाविकांनी सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून दक्षिणद्वार सोहळ्यासाठी गर्दी केली. मात्र संथ गतीने पाणी वाढत असल्यामुळे दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे 4 वाजता संपन्न झाला.

यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने आणि चारही बाजूने कृष्णा नदीने मंदिरला वेढल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. तसेच अन्नछत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीचे पाणी ओसरेपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.