आंबेगावात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई करणार; अँटिड्रोन गन घेण्यासाठी सूचना

drone

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मागील महिन्याभरापासून रात्रीचेकाही ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात आहे. तसेच याबाबत अनेक अफावाही फिरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आता घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर कारवाई करण्यात येणार आहे. साठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून अँटिड्रोन गन घेण्यासाठी तातडीने सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. पारगाव (ता. आंबेगाव )येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे मंगळवारी दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

एक महिन्यापासून आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात विशेषतः डोंगर भागाजवळ असलेल्या गावांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहे. या ड्रोन मुळे नागरिकांमध्ये अनेक अफवा पसरत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहे. या अज्ञात ड्रोनबाबत प्रशासनाने सुरु केलेल्या कारवाई बाबत बोलताना वळसे म्हणाले दिवसा अथवा रात्री विनापरवानगी आकाशात ड्रोन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. पोलीस विभागाने ड्रोन पाडण्यासाठी आधुनिक अँटी ड्रोन गन मशिन मागवली आहे. त्यासाठी तातडीने 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मशीन उपलब्ध होणार असून त्या मशिनद्वारे घिरट्या घालणारे अज्ञात ड्रोन पाडण्याची कारवाई केली जाईल त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये,असे त्यांनी स्पष्ट केले.