लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये भव्य सभा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले. तसेच विश्वासघात करणाऱ्यांना गद्दारांना विधानसभा निवडणुकीतही धडा शिकवायचाच, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली.
जेव्हा गद्दारी झाली आणि पन्नास खोके-एकदम ओके झाले तेव्हा आपल्या पक्षाचं काय होणार? असं वातावरण होतं. आपला पक्ष राहणार की नाही? किती लोक जाताहेत? किती थांबताहेत? असं चित्र निर्माण केलं होतं. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बाहेर पडा, जनतेला भेटा आणि जनतेचे आशीर्वाद घेत राहा, आदेश दिले होते. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आपण जे काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं आहे. तेव्हा ज्या काही पहिल्या पाच-सहा सभा झाल्या होत्या त्यापैकी मुंबई बाहेरची पहिली सभाही कर्जतमध्येच झाली होती. तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत गद्दार गँगचे नेते, मिंधे ते सुरतवरून गुवाहाटीला पळत होते. आणि त्याच दिवशी बरोबर इथे आपली सभा झाली होती. आणि लोक आपल्यासोबत आहेत आणि महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे, हे मी उद्धवसाहेबांना सांगितलं होतं. कारण आपण जे काम करून दाखवले आहे, त्यासाठी महाराष्ट्राचीच काय, देशाची जनताही आपल्यासोबत आहे, असा दृढ विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
शंकाराचार्यजी कालच घरी आले होते. उद्धवसाहेबांना आणि आम्हाला आशीर्वाद दिले. काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता जनार्दनचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलो आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हीच आपली वारी आहे. धर्मात सर्वांत मोठं पाप हे विश्वासघाताचं पाप असतं, हे शंकराचार्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मीडियासमोर ते हेच बोलले. विश्वासघातापेक्षा दुसरं मोठं कुठलंच पाप नाही. आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदू नाहीच, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर केली.
शंकराचार्य यांनी काल केलेलं विधान हे धर्माचार्य म्हणून त्यांनी सांगितलं. ते राजकारणात जात नाहीत आणि राजकारणावर बोलत नाहीत. मात्र वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेलं प्रेम, आदर आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही तर घरातील चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणून त्यांना आशीर्वाद द्यायला शंकराचार्य घरी आले होते. शंकराचार्यांनी खरं सांगितलं आहे. धर्मात विश्वासघाताशिवाय दुसरं कोणतंही मोठं पाप नाही. हे पाप या गद्दारांनी केलेलं आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत आपण धडा शिकवलेला आहे आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांना धडा शिकवायचाच, अशी गर्जना यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. हा विश्वासघात त्यांनी जो केलेला आहे तो लक्षात घ्या. ही गद्दारी फक्त शिवसैनिकांसोबत आणि उद्धव ठाकरेंशी केलेली नाही तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसून केलेली आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
आपण महत्त्वाचा एक टप्पा जिंकलोय. लोकसभेत आपला विजय झाला आहे. विजय दोन गोष्टींचा झालेला आहे. पहिली गोष्ट… जो भाजप मोदी सरकार, भाजप सरकार या पासून दूर जायला तयार नव्हता आज एनडीएचं सरकार बोलत आहे, भाजप स्वतःचं कुठेही नाव घेत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे… ज्या भाजपला आपल्या राज्यात, देशात हुकूमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाही संपवायची होती. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, ते बदलायचं होतं. आणि हे नरेटिव्ह नाही. भाषणं काढून बघा. आम्हाला चारसो पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं भाजपचे पाच सहा उमेदवार त्यावेळी बोलले होते. आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं महाराष्ट्रात पंकजा मुंडे एका सभेत बोलल्या होत्या. त्या विरोधात आपण उभे राहिलो. कारण आपण सर्व आंबेडकर प्रेमी आणि देशभक्त जनता आहोत. आपल्याला या देशाचं हित बघायचं आहे, फक्त भाजपचं नाही. आणि जर हे चारशे, तीनेश काय 272 जरी पार झाले असते तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं. आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता. सर्वांचा आवाज दाबला गेला असता. मात्र, इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये जे वातावरण होतं, त्याने परिवर्तन घडलं आणि भाजपला संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे, यासाठी देशाचं अभिनंदन करतो, असे आदित्य आठारे म्हणाले.
लोकशाही वाचवण्याचा आपण जो प्रयत्न करत होतो, तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. पण आता दुसरा टप्पाही महत्त्वाचा आहे, विधानसभेची निवडणूक लागणार आहे. महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणात विधानभा निवडणूक होणार आहे. या तीन राज्यांवर केंद्र सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कर्जत येथील शेळके मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या ‘भव्य शिवसैनिक मेळाव्या’त युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. ह्यावेळी ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, रायगड जिल्हा… pic.twitter.com/UIQNE4ZjPb
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 16, 2024
भाजप 240 वर जरी असली तरी आपण ‘इंडिया’ आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 वर आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात लवकरच आपलं सरकार येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत काय वातावरण बनवलेलं आहे? आपल्या राज्यात जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत हे घटनाबाह्यच आहेत. चाळीस गद्दार राजीनामा न देता, निवडणूक न लढता मुख्यमंत्री बनू शकतात, मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. असं कुठेही संविधानात लिहिलेलं आहे का? मग हे घटनाबाह्यच, असा भीमटोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये ना मुंबई महापालिका, ना पुणे महापालिका, ना नवी मुंबई महापालिका, ना ठाणे महापालिका, वसई-विरार, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर असेल इथे कुठेही महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत झालेली नाही. कारण महाविकास आघाडी जिंकणार याची त्यांना सतत भीती आहे. भाजपच्या मनात ही भीती आहे. महाराष्ट्रात लोकशाही संपलेली आहे. संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे. ईडी, सीबीआय, पोलीस, निवडणूक यंत्रणा सगळं भाजपच्या हातात असूनही लोकसभा निवडणुकीत जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप महाराष्ट्रात 9 वर आलेला आहे. आणि आपल्याला त्यांनी संपवायचा प्रयत्न केला. 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईत 45 ते 50 नगरसेवक पळवले. सगळं काही पळवूनही आपणही 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्षही आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. हा या मातीचा चमत्कार आहे. कारण ही भूमी साधू संतांची आणि वीर योद्ध्यांची आहे, असा जोश आदित्य ठाकरे यांनी भरला.
विधानसभा निवडणुकीला दोन-तीन महिने राहिले असेल वाटत असले तरी ही निवडणूक प्रत्येकाच्या मनात सुरू झालेली आहे. आताही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सर्वच उद्धव ठाकरे यांना येऊन सांगत आहेत, आम्ही तुम्हाला मत दिले आहे. तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून मतदान केलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बसवावचं लागेल, हे आम्ही पक्क ठरवल्याचे लोक सांगत आहेत. कारण महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि महायुती सरकारची दोन वर्षे पाहिली तर आज महाराष्ट्राचे हाल केलेल आहेत. तर प्रत्येकाला महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचंय आणि बदल हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचंय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत त्यांनी पूर्ण बळ वापरलं. आता अलिबाबा और चाळीस चोरांना पक्क माहिती आहे ते हरणार आहेत. म्हणूनच ते सर्व छळकपट करतील. तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विकले जाणार आहात? … असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थित शिवसैनिकांनी नाही… म्हणत जोरदार प्रतिसाद दिला. सावधन राहणं गरजेचं आहे आणि तेवढचं काम करणं गरजेचं आहे. कारण आता हे अफवा पसरवणार, हा येतोय तो येतोय… असं होणार तसं होणार… पण यांचं सरकार बनत नाही. यांचे आमदार निवडून येणार नाहीत. यांचं पुढे काही चालणार नाही, महाराष्ट्र यांना हाकलवणार आहे, ही शपथ घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, असे आदित्य ठाकरे गरजले.
पोलीस भरतीसाठी साडेसतरा लाख तरुण-तरणींना अर्ज केला. हे सगळं होत असताना मुंबईत तरुणांना जोगेश्वरी, गोरेगावच्या पुलाखाली झोपवलं. महाराष्ट्र आज चाललाय कुठे, याचा विचारही करू शकत नाही. आणि यांच्या फसव्या योजनांना बळी पडून उद्या चुकून यांचं सरकार बसलं तर मंत्रालयही हे मुंबईतून गुजरातमध्ये हलवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला असं महायुतीचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे ही विश्वासू व्यक्ती आहे. ज्यांच्यावर शेतकरी, महिला आणि कामगार, उद्योगपतीही विश्वास ठेवतात. हा माणूस आपल्याला कधीही फसवणार नाही. महाराष्ट्र हिताचाच विचार करेल, देश हिताचाच विचार करेल. मग तुम्ही कुणाच्या बाजून उभे राहणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीच्या बाजूने? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सभेत विचारताच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा विजय असो… म्हणत घोषणा दिल्या.
महाराष्ट्राचं पुढचं चित्र हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याचे आर्टिस्ट आहात. महाराष्ट्राचं चित्र कसं ठरवायचं हे तुम्ही घडवायचं आहे. जर भाजपचं सरकार आलं तर हे मंत्रालय गुजरातला हलवतीलच, उद्योगही हलवतील. कामगार कायदेही ते बदलणार आहेत. शंभर दिवसाची नोकरी असेल. मालक तुम्हाला कधीही काढू शकतो, नोटीस न देता काढू शकतो. हे सगळं जे भाजपच्या मनात आहे, ते रोखणं गरजेचं आहे. ते रोखल्यावरच आपला महाराष्ट्र आघाडीवर राहील, आता आपण जसं सहा की दहा राज्यांच्या मागे आहोत तसा आपला विकासदर कमी होत जाईल आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही, पण भाजपला आपलं घर पेटवायला लागेल. यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे भाजपसोबत जायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभं राहायचं? म्हणून आजपासून हा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक दिवस प्रचाराचा ठरणार आहे. प्रत्येक घरात मशाल पेटलीच पाहिजे, प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे. कुठेही गफलत होता कामा नये. ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.